( संगमेश्वर / प्रतिनिधी )
पंचकोशातून व्यक्तिमत्व विकासाचे व्रत स्वीकारलेल्या परशुराम एज्युकेशन सोसायटीच्या यु.इं.स्कूलच्या गुरुकुल विभागात उपक्रम आधारित विद्यार्थीयव्यक्तिमत्व विकासाचे काम वर्षभर चालू असते.याचाच एक भाग म्हणून गुरुकुलातील पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांसाठी तिसऱ्या निवासी शिबिराचे आयोजन गुरुकुल विभागात करण्यात आले होते.
या निवासी शिबिराची सुरुवात ज्ञानप्रबोधिनीची भगिनी संस्था असलेल्या मातृमंदिर विश्वस्त संस्था निगडी पुणे आयोजित समूह गायन स्पर्धेने झाली. सलग तीस वर्ष अखंडपणे चालू असणाऱ्या या राज्यस्तरीय समूह गायन स्पर्धेचे हे ३१ वे वर्ष ! गुरुकुल विभाग या स्पर्धेत विद्यार्थी समूहगायन, अध्यापक समूहगायन, पोवाडा गायन आणि सूर्यनमस्कार अशा चार स्पर्धांमधून भाग घेत सलग तिसऱ्या वर्षी सहभागी झाला होता. या स्पर्धा कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गुरुकुलातील इयत्ता आठवी मधील कुमारी अवनी सचिन भुवड हिने केले.
बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या राष्ट्रीय गीताला १५० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने वंदे मातरम चे वर्णन करणारे समूहगीत आणि शेकडो शास्त्रज्ञांना प्रेरणा देत भारताच्या अंतराळ मोहिमेची मुहूर्तमेढ करून इस्रोचे जनक ठरलेल्या ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ डॉ. विक्रम साराभाई यांच्या पराक्रमाचे गुणगान करणारा इस्रोचा पोवाडा गुरुकुलातील विद्यार्थ्यांनी अत्यंत तालासुरात सादर केला.
या दोनही गीतांची शब्दरचना आणि संगीत गुरुकुलातील कलाध्यापक पराग लघाटे यांनी केले होते. गुरुकुलातील संगीत शिक्षक वरद केळकर यांचे विशेष मार्गदर्शन गाण्याच्या संगीत संयोजनासाठी लाभले. यासोबतच गुरुकुलातील सर्व अध्यापक आणि पालक यांनी सामूहिकरित्या सादर केलेल्या ‘वंद्य वंदे मातरम’ आणि विद्यार्थ्यांचे लयबद्ध सूर्यनमस्कार सादरीकरण या साऱ्याचेच निगडी पुणे इथून आलेले परीक्षक आदित्य शिंदे यांनी भरभरून कौतुक केले.
शिबिराच्या दुसऱ्या सत्रात आदित्य शिंदे यांनी मुलांशी संवाद साधताना आपल्या ओजस्वी वक्तृत्वातून विद्यार्थ्यांना डॉ. विक्रम साराभाई, डॉ. वसंतराव गोवारिकर इत्यादींच्या प्रेरक गोष्टी सांगत विद्यार्थ्यांना आवर्जून इस्रोला भेट देण्याचे आवाहन केले.
मध्यंतरात सर्व शिबिरार्थी विद्यार्थ्यांनी निवासी शिबिरातील रुचकर भोजनाचा मनसोक्त आस्वाद घेतला.
भोजनोत्तर सत्रामध्ये सेवासाधना प्रतिष्ठान भिलेकेतकी यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी हस्त कौशल्य मार्गदर्शन सत्राचे आयोजन करण्यात आले होते. नारळाच्या करवंट्यांपासून शोभेच्या वस्तू तयार करण्याचे कृतीकार्य सेवा साधना प्रतिष्ठानच्या शुभमदादा लिबे आणि सुरजदादा शिगवण यांनी प्रात्यक्षिक दाखवून घेतले. कानस,हेक्सा ब्लेड,सॅन्ड पेपर आणि अन्य साहित्य हाताळण्याचा पहिलाच अनुभव विद्यार्थी घेत होते विद्यार्थ्यांनी स्वतःच्या कल्पनेचा उपयोग करून छान छान आकार करवंट्या कापून तयार केले आणि आकर्षक रंगाने त्यावर सजावट केली हस्त कौशल्याचे काम करताना लागणारी एकाग्रता आणि साहित्य वापरताना घ्यावयाची काळजी अशा गोष्टींचा अनुभव या सत्रांमधून विद्यार्थ्यांनी घेतला.
रविवार दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सकाळी लवकर उठून नियमित उपासना योग प्राणायाम आणि सूर्यनमस्कार इत्यादी होऊन शिबिराची सांगता झाली. युनायटेड इंग्लिश स्कूलचे मुख्याध्यापक विभाकर वाचासिद्ध सर यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुकुलातील सर्व अध्यापकांच्या सामूहिक सहभागातून हे शिबिर उत्तम प्रकारे संपन्न झाले.

