(ठाणे)
ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ येथे 6 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याच्या घटनेनंतर तणाव वाढला आहे. या प्रकरणात आपल्याला मानसिक त्रास दिला जात असल्याचा आरोप करत उपचार करणाऱ्या महिला डॉक्टराने आत्महत्येचा प्रयत्न केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. दरम्यान, संबंधित सामाजिक कार्यकर्त्यांनी हे आरोप फेटाळून लावत कायदेशीर लढा उभारण्याची भूमिका घेतली आहे.
काय घडलं नेमकं?
अंबरनाथच्या महालक्ष्मी नगर परिसरात राहणाऱ्या 6 वर्षीय विजय विनोद जयस्वाल याला सर्दी-खोकल्याचा त्रास होता. त्याच्यावर डॉ. स्वप्नाली गायकर यांच्याकडे उपचार सुरू होते. उपचारांच्या तिसऱ्या दिवशी सलाईन लावल्यानंतर घरी गेल्यावर मुलाची प्रकृती बिघडली. त्यानंतर खासगी आणि सरकारी रुग्णालयात दाखल केल्यानंतर उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याला तातडीने सायन रुग्णालयात हलवण्यात आले असताना दुर्दैवाने तिथे त्याचा मृत्यू झाला.
पालकांनी पोस्टमार्टम अहवालानंतर दोष निश्चित झाल्यास कारवाईची मागणी केली होती. मात्र, पालकांची औपचारिक तक्रार नसताना काही सामाजिक कार्यकर्त्यांकडून आपल्याला त्रास दिला जात असल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. ही सामाजिक कार्यकर्ते आणि संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून सातत्याने होत असलेल्या मानसिक छळामुळे आणि सोशल मीडियावरील बदनामीमुळे आपण हे पाऊल उचलल्याचा आरोप डॉक्टर गायकर यांनी केला आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल करून आणि सातत्याने मानसिक दडपण आणल्याचा दावा डॉक्टरांनी केला आहे.
मानसिक छळाचा आरोप, आत्महत्येचा प्रयत्न
“पालकांची कोणतीही तक्रार नसताना काही लोकांकडून माझी बदनामी सुरू आहे. दवाखाना बंद करण्याच्या धमक्या दिल्या जात आहेत,” असा आरोप डॉ. गायकर यांनी केला. या मानसिक तणावाला कंटाळून त्यांनी शुक्रवारी रात्री आत्महत्येचा प्रयत्न केला. कुटुंबीयांनी तातडीने रुग्णालयात दाखल केल्याने त्यांचा जीव वाचला. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात आलं आहे.
दरम्यान, ज्या सामाजिक कार्यकर्त्यांवर आरोप करण्यात आले आहेत, त्यांनी हे सर्व आरोप ठामपणे फेटाळून लावले आहेत. महिला डॉक्टरांकडून केला जात असलेला आरोप हा केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न असून, स्वतःच्या चुकीच्या कृतींवर पडदा टाकण्यासाठीच हा तथाकथित “ड्रामा” करण्यात येत असल्याचा दावा त्यांनी केला आहे.
“संबंधित 6 वर्षीय मुलाचा मृत्यू उपचारादरम्यान झाला असून त्याला जबाबदार डॉक्टरच आहेत. या प्रकरणात सत्य बाहेर यावं यासाठी आम्ही कायदेशीर मार्गाने लढा देत आहोत आणि तो सुरूच राहील. कोणाच्याही दबावाला किंवा भावनिक मुद्द्यांना आम्ही बळी पडणार नाही,” अशी ठाम भूमिका सामाजिक कार्यकर्त्यांनी मांडली आहे. तसंच, या प्रकरणात पोस्टमार्टम अहवाल आल्यानंतर संपूर्ण सत्य समोर येईल आणि दोषींवर कारवाई व्हावी, हीच आमची मागणी असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
पोस्टमार्टम रिपोर्टची प्रतीक्षा
या प्रकरणातील पोस्टमार्टम अहवाल अद्याप आलेला नाही. दोष कुणाचा हे अहवालानंतर स्पष्ट होणार आहे. तोपर्यंत आरोप-प्रत्यारोप सुरू असले तरी संपूर्ण प्रकरणावर प्रशासन आणि आरोग्य यंत्रणेचं लक्ष आहे. प्रकरण न्यायप्रविष्ट असून अंतिम निष्कर्ष पोस्टमार्टम अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.

