(रत्नागिरी / प्रतिनिधी)
कोकणातील नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत शिंदे गटाच्या शिवसेनेने भक्कम कामगिरी करत आपली ताकद सिद्ध केली. कधीकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या कोकणात उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील गटाला मोठा फटका बसल्याचे चित्र होते. विशेषतः दापोलीत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी विरोधकांचा संयुक्त सामना करत आपला गड अभेद्य राखला.
दापोली तालुक्यात जिल्हा परिषदेच्या सहाही जागांवर तसेच पंचायत समितीच्या १२ पैकी १० जागांवर शिंदे गटाने विजय मिळवला. भाजप आणि राष्ट्रवादीला केवळ दोन गणांत समाधान मानावे लागले, तर उद्धव ठाकरे गटाची प्रभावी घसरण झाली. मात्र, निवडणुकीतील या विजयानंतर आता दापोलीच्या राजकारणात नव्या घडामोडींना वेग आला आहे. दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठच्या कार्यकारी परिषदेवर विधान परिषदेचे आमदार मिलिंद नार्वेकर यांची थेट निवड झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत. ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख असलेल्या नार्वेकर यांच्या या निवडीमुळे कदम यांच्या बालेकिल्ल्यात राजकीय खळबळ उडाली आहे.
शिवसेनेतील फुटीनंतर राज्याच्या राजकारणात निर्माण झालेल्या अस्थिरतेच्या काळात नार्वेकर चर्चेत आले होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवादाच्या निमित्ताने त्यांच्या भेटीगाठी झाल्या होत्या. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्कांना उधाण आले होते. तथापि, ते आजही उद्धव ठाकरे यांच्या गटात सक्रिय असल्याचे स्पष्ट आहे. महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाकडून जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती यांनी नार्वेकर यांची कृषी विद्यापीठाच्या कार्यकारी परिषदेवर सन्माननीय सदस्य म्हणून निवड केल्याचे नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, सत्ताधारी गटाच्या प्रभावक्षेत्रातील संस्थेवर विरोधी गटाशी संबंधित नेत्याची नियुक्ती झाल्याने या निर्णयाकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहिले जात आहे.
दापोलीतील राजकीय समीकरणे अलीकडच्या निवडणुकीत स्पष्ट झाली असली, तरी या नियुक्तीमुळे स्थानिक पातळीवर नवी चर्चा सुरू झाली आहे. आगामी काळात या निर्णयाचे राजकीय परिणाम काय उमटतात, याकडे कोकणातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

