( मुंबई )
गेल्या अनेक वर्षांपासून मराठी मालिकांमधून प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारी अभिनेत्री अपूर्वा नेमळेकर हिने 14 फेब्रुवारी रोजी विवाहबंधनात अडकत आपल्या चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी अपूर्वाने आपल्या लग्नाचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर करत नव्या आयुष्याची घोषणा केली.
लग्नानंतर अपूर्वाने सोशल मीडियावर आपले नाव बदलून अपूर्वा नेमळेकर गोवलकर असे केले असून, पोस्टच्या शेवटी तिने “Mrs. Apurva Tanuj Govalkar” असे लिहीत नवऱ्यावरील प्रेम व्यक्त केले आहे. तिच्या या पोस्टने काही मिनिटांतच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले.
नवऱ्यासाठी भावनिक पोस्ट
नवऱ्यासोबतचे फोटो शेअर करत अपूर्वाने एक भावनिक आणि मनाला स्पर्श करणारी पोस्ट लिहिली आहे.
“14 फेब्रुवारी 2026 — एक अशी तारीख जी कायमची आमची झाली. प्रेम, विश्वास आणि जवळच्या माणसांच्या आशीर्वादात आम्ही आयुष्याचा नवा अध्याय सुरू केला. आयुष्याने मला खूप शिकवलं, तोडलं आणि पुन्हा उभं केलं… पण प्रेमावरचा विश्वास कधीच हरवला नाही. सर्व प्रतीक्षेनंतर, देवाने मला सहवास दिला. व्हॅलेंटाईन डे ला प्रेमाला त्याचं घर सापडलं.”
अशी भावना तिने या पोस्टमधून व्यक्त केली आहे.
दुसऱ्या लग्नाची नवी सुरुवात
अपूर्वाने याआधी दिलेल्या मुलाखतींमध्ये पहिल्या लग्नातील त्रासाबद्दल उघडपणे सांगितले होते. योग्य वेळ आणि योग्य व्यक्ती आयुष्यात आल्यावरच पुन्हा लग्न करेन, असे तिने स्पष्ट केले होते. अखेर 14 फेब्रुवारी या प्रेमाच्या दिवशी तिने दुसरे लग्न करत आयुष्याला नवी दिशा दिली आहे.
शुभेच्छांचा वर्षाव
अपूर्वाच्या या पोस्टनंतर चाहत्यांसह अनेक मराठी कलाकारांनीही कमेंट्सद्वारे तिला भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत. “नव्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा”, “तू खूप आनंदी दिसतेस” अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर झळकत आहेत. अपूर्वाच्या आयुष्यातील ही नवी सुरुवात तिच्या चाहत्यांसाठीही खास ठरत असून, तिच्या आनंदात सगळेच सहभागी होताना दिसत आहेत.

