(दापोली)
नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राष्ट्रीय दानपट्टा अजिंक्यपद स्पर्धेत दापोली तालुक्यातील एम. के. इंग्लिश स्कूल, आंजर्ले येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय कामगिरी करत एक सुवर्ण व दोन रौप्य पदकांची कमाई केली.
या स्पर्धेत देशभरातील पाच राज्यांतील ३६४ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. आंजर्ले हायस्कूलच्या श्रेयस गणेश राऊत याने १४ वर्षाखालील गटात एक सुवर्ण आणि एक रौप्य पदक पटकावले. तर नैतिक मंगेश बाईत याने १६ वर्षाखालील गटात रौप्य पदक मिळवले.
या यशस्वी कामगिरीसाठी दोन्ही खेळाडूंना रत्नागिरी जिल्ह्याचे मर्दानी खेळ प्रशिक्षक श्री. चिन्मय सुधीर गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षनामुळेच हे उज्ज्वल यश शक्य झाले.
या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत असून, आंजर्ले शिक्षण संस्था, एम. के. इंग्लिश स्कूलचे शिक्षकवृंद व पालक वर्गाने खेळाडू तसेच प्रशिक्षकांचे अभिनंदन केले आहे.