( मुंबई )
राज्यातील नऊ विभागांतील ५ हजार मुख्य केंद्रांवर आजपासून इयत्ता दहावीच्या अंतिम परीक्षेस सुरुवात झाली. सरकारने मोठा गाजावाजा करत कॉपीमुक्त अभियान राबवले गेले होते. यंदा परीक्षेला १६ लाख ११ हजार ६१० विद्यार्थी बसले आहेत. तर यामध्ये ८ लाख ६४ हजार १२० मुले, ७ लाख ४७ हजार ४७१ मुली, तर १६ ट्रान्सजेंडर परीक्षा देणार आहेत. परीक्षेसाठी एकूण २९ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधून विद्यार्थ्यांची नोंदणी केली आहे. मात्र दहावीचा पहिलाच पेपर फुटल्याची चर्चा सुरू झाली आहे.
दहावी बोर्ड परीक्षा सुरू झाल्याच्या आजच्या पहिल्याच दिवशी मराठीचा पेपर फुटला आहे. जालन्यातील एका परीक्षा केंद्रावर दहावीचा मराठीचा पेपर फुटला असून पेपर सुरू झाल्यानंतर काही वेळातच उत्तर पत्रिकेच्या झेरॉक्स समोर आल्या आहेत. जालन्यातील बदनापूर येथील प्रकार असून या घटनेने शिक्षण वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकीकडे शिक्षणमंत्री परीक्षा केंद्रावर भेट देऊन कॉपीमुक्त अभियानाची पाहणी करत आहेत. मात्र, दुसरीकडे मराठवाड्यात पेपर फुटीने खळबळ उडाली असून येथील अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमेतवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
कॉपी मुक्ती अभियानासाठी अनेक पावले उचलली होती. त्यासंदर्भात माध्यमांमध्ये मंडळाने परीक्षा सुरळीत होणार असल्याचा दावा केला होता. परंतु मराठी विषयाच्या पहिल्याच पेपरला गोंधळ उडाला आहे. शुक्रवारी सकाळी ११ वाजता पेपरला सुरुवात झाली. त्यानंतर जालना येथे अवघ्या पंधरा ते वीस मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका बाहेर आली. जालन्यातील बदनापूर येथील केंद्रावर हा प्रकार घडाला. या ठिकाणी असलेल्या एका झेरॉक्स सेंटरवर थेट उत्तरपत्रिकांच्या झेरॉक्स करुन विद्यार्थ्यांना पुरवला गेला. येथे चक्क २० रुपयात दहावीच्या प्रश्नपत्रिका मिळत होत्या. जालना शहरातील झेरॉक्ससेंटरमधून उत्तरपत्रिकांच्या प्रिंट काढून विद्यार्थ्यांना पुरवल्या जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच यवतमाळ जिल्ह्यातही दहावीचा पेपर फुटल्याची चर्चा समाज माध्यमांवर सुरू आहे.
परीक्षा केंद्रावर समाज माध्यमांवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाल्याची माहिती आल्याने आम्ही परीक्षा केंद्र संचालक पर्यवेक्षक यांच्याकडे माहिती मागवली असून अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई करण्यात येईल. विभागीय शिक्षण मंडळाच्या शिक्षा सूचीनुसार बडतर्फ करणे, फौजदारी गुन्हा दाखल करणे, मंडळ मान्यता रद्द करणे अशा प्रकारची कारवाई होऊ शकते, असे डॉ. वैशाली जामदार (विभागीय सचिव, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, छत्रपती संभाजीनगर) यांनी सांगितले.