(छत्रपती संभाजीनगर)
राज्यात मोठ्या प्रमाणावर चर्चेत असलेल्या बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्य आरोपी वाल्मिक कराड याला मोठा धक्का बसला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने कराडचा जामीन अर्ज फेटाळला आहे. या प्रकरणातील जामीन अर्जावर गेल्या तीन दिवसांपासून सविस्तर युक्तिवाद सुरू होता. दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकाल देत कराडला जामीन देण्यास नकार दिला. याआधी विशेष न्यायालय आणि सत्र न्यायालयानेही कराडचा जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्याने औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती, मात्र तेथेही त्याला दिलासा मिळाला नाही.
जामीन अर्जावर सुनावणीदरम्यान बचाव पक्षाच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की, वाल्मिक कराडचा संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी थेट संबंध नाही. घटनेच्या दिवशी तो शेकडो किलोमीटर दूर होता आणि त्याला खोट्या पद्धतीने या प्रकरणात गोवण्यात आले आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या ‘मिहीर शहा’ निर्णयाचा दाखला देत आरोपीला अटकेची कारणे लेखी स्वरूपात देणे बंधनकारक असताना ती देण्यात आलेली नाहीत, असा दावा करण्यात आला. मकोका कायदा चुकीच्या पद्धतीने लावण्यात आल्याचा युक्तिवादही बचाव पक्षाने न्यायालयात मांडला.
यावर सरकारी वकील अमरसिंह गिरासे यांनी न्यायालयासमोर संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे मांडत, वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट केले. तपासात समोर आलेले पुरावे, साक्षीदारांचे जबाब आणि प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता आरोपीला जामीन देणे योग्य ठरणार नाही, अशी ठाम भूमिका सरकारी पक्षाने मांडली. सर्व बाजूंचा विचार करून औरंगाबाद खंडपीठाने वाल्मिक कराड हा मुख्य संशयित आरोपी असल्याचे मान्य करत त्याचा जामीन अर्ज फेटाळला.
न्यायालयाचा निकाल जाहीर होताच संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांनी समाधान आणि आनंद व्यक्त केला. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी प्रतिक्रिया देताना, आम्ही न्याय व्यवस्थेवर विश्वास ठेवला होता आणि आज आम्हाला न्याय मिळण्याची सुरुवात झाल्याची भावना व्यक्त केली. त्यांनी या निकालाला ‘काव्यात्मक न्याय’ असे संबोधत सांगितले की, ज्या दिवशी त्यांच्या भावाच्या मारेकऱ्यावर मकोका कायदा लावण्यात आला तो दिवस राष्ट्रसंत भगवान बाबा यांची जयंती होती, तर मकोका कायदा ज्यांनी अस्तित्वात आणला त्या गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिवशी या प्रकरणातील युक्तिवाद झाला. न्यायालयाच्या या निर्णयामुळे आम्हाला न्याय मिळेल, असा विश्वास अधिक दृढ झाला असल्याचेही त्यांनी नमूद केले.
धनंजय देशमुख यांनी यावेळी गंभीर आरोप करत सांगितले की, या प्रकरणामागे टोळीशाही आणि राजकीय आश्रय कसा होता, हे लवकरच समोर येईल. याबाबत आपल्यावर दबाव येण्याची शक्यता असल्याचे पत्र आपण न्यायालयात दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. न्यायालयाने दिलेल्या निकालाबद्दल त्यांनी आभार मानत, या निर्णयामुळे न्याय व्यवस्थेवरील विश्वास अधिक मजबूत झाल्याचे सांगितले.

