(पुणे)
पुण्यातील गुन्हेगारी जगतात कुख्यात असलेला शाहरुख शेख उर्फ ‘अट्टी’ (वय २३) याचा काही दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावाजवळ भल्या पहाटे पुणे पोलिसांच्या कारवाईत एन्काउंटर करण्यात आला. गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाने ही धडक मोहीम राबवली. या कारवाईने पुणे आणि सोलापूर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. शेखविरुद्ध २०११ पासून खून, दरोडा, गोळीबार यांसारख्या गंभीर स्वरूपाच्या १५ पेक्षा अधिक गुन्ह्यांची नोंद होती. त्यामुळे त्याच्यावर ‘मोक्का’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम) अंतर्गतही गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून शाहरुख शेख सोलापूर जिल्ह्यातील लांबोटी गावात नातेवाईकांच्या घरी लपून बसल्याचे उघड झाले. त्यानंतर पुणे गुन्हे शाखेच्या युनिट ६ चं पथक तातडीने सोलापूरला रवाना झालं आणि त्यांनी संबंधित ठिकाणी छापा टाकला. छापेमारीदरम्यान पोलिसांना पाहताच शाहरुखने गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी गोळीबार केला. चकमकीत शाहरुखला चार गोळ्या लागल्या आणि तो गंभीर जखमी झाला. त्याला तत्काळ सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात नेण्यात आलं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या धाडसी आणि यशस्वी कारवाईचे पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी विशेष कौतुक केलं असून, गुन्हे शाखेच्या युनिट ६ च्या पथकाला ₹१ लाखाचे पारितोषिक जाहीर केलं आहे. ही कारवाई राज्यभरातील पोलिस दलासाठी धाडस आणि कार्यक्षमतेचं प्रतीक ठरली आहे.
वडिलांकडून पोलिसांवर आरोप
दरम्यान, एन्काउंटरनंतर शाहरुख शेखचे वडील यांनी माध्यमांशी बोलताना पोलीस कारवाईवर नाराजी व्यक्त केली. “माझा मुलगा किरकोळ गुन्ह्यांत अडकलेला असला, तरी तो कुख्यात गुंड नव्हता. पोलिसांनी त्याच्यावर चुकीचा ‘मोक्का’ लावला,” असा आरोप त्यांनी केला. ते पुढे म्हणाले, “तो कामावर लागला होता आणि सुधारण्याचा प्रयत्न करत होता. पण पोलिसांनीच त्याला पुन्हा गुन्हेगारीकडे ढकललं. काळेपडळ पोलीस ठाण्यातील संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी,” अशीही मागणी त्यांनी केली.