(हरारे)
भारतीय अंडर-19 क्रिकेट संघानं इतिहास घडवला आहे. 19 वर्षांखालील विश्वचषकाच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात भारतानं अफगाणिस्तानविरुद्ध 311 धावांचं आव्हान यशस्वीपणे पूर्ण करत अंतिम फेरीत धडक दिली. हा अंडर-19 वर्ल्डकपच्या इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी रनचेस ठरला. भारतानं अवघ्या 41.1 षटकांत 7 विकेट्स राखून सामना जिंकत विक्रमी 10व्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला.
वैभव सूर्यवंशीचं वादळ, अफगाणिस्तानची दाणादाण
मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघ पहिल्या षटकापासूनच दबावमुक्त दिसत होता. सलामीवीर वैभव सूर्यवंशीने अफगाण गोलंदाजांवर अक्षरशः हल्ला चढवला. वैभवने केवळ 33 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 68 धावांची स्फोटक खेळी केली. त्याने अवघ्या 24 चेंडूत अर्धशतक झळकावले, ज्यामुळे 311 धावांचं लक्ष्यही भारतीय संघासमोर लहान वाटू लागलं.
एरॉन जॉर्जचं दमदार शतक
या सामन्याचा खरा हिरो ठरला सलामीवीर एरॉन जॉर्ज. दबावाच्या क्षणी संयमी आणि आक्रमक खेळी करत त्याने 95 चेंडूत शतक पूर्ण केलं. जॉर्ज 104 चेंडूत 115 धावा करून बाद झाला. त्याला कर्णधार आयुष म्हात्रे (62) यांची उत्तम साथ लाभली. या दोघांनी 100 पेक्षा अधिक धावांची महत्त्वाची भागीदारी रचली. शेवटी विहान मल्होत्रा (38*) आणि वेदांत त्रिवेदी (5*) यांनी सामना सहज संपवला.
अफगाणिस्तानची झुंजार फलंदाजी
त्याआधी अफगाणिस्ताननं भारताविरुद्ध उत्कृष्ट फलंदाजी करत 50 षटकांत 4 विकेट्स गमावून 310 धावा केल्या. सलामीवीरांनी भक्कम पाया रचला, तर नंतर फैसल शिनोजादा आणि उझैरुल्लाह नियाझाई यांनी डावाला भव्य रूप दिलं. फैसल शिनोजादानं 110 धावांची शानदार शतकी खेळी केली, तर उझैरुल्लाह नियाझाईनं शेवटच्या षटकांत आक्रमक फटकेबाजी करत 86 चेंडूत नाबाद 101 धावा केल्या. या दोघांमधील 148 धावांच्या भागीदारीमुळे अफगाणिस्ताननं उपांत्य फेरीतील त्यांची सर्वोच्च धावसंख्या उभारली. भारताकडून दीपेश देवेंद्रन आणि कनिष्क चौहान यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या.
अंतिम फेरीत इंग्लंडचं आव्हान
अंडर-19 विश्वचषकाचा अंतिम सामना 6 फेब्रुवारीला खेळवला जाणार असून, भारतासमोर इंग्लंडचं कडवं आव्हान असणार आहे. इंग्लंडनं उपांत्य फेरीत ऑस्ट्रेलियाचा 27 धावांनी पराभव केला होता.
भारताचा सुवर्ण इतिहास
भारताने आतापर्यंत 2000, 2008, 2012, 2018 आणि 2022 अशा पाच वेळा अंडर-19 विश्वचषक जिंकला आहे. चार वेळा उपविजेतेपदही पटकावलं असून, 2024 मध्ये अंतिम फेरीत ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला होता.आता इंग्लंडविरुद्ध अंतिम सामन्यात भारत सहाव्या विजेतेपदासाठी मैदानात उतरणार असून, क्रिकेट चाहत्यांचं लक्ष या लढतीकडे लागून राहिलं आहे.

