(मुंबई)
टी-20 क्रिकेट वर्ल्ड कप 2026 ची उत्सुकता चांगलीच वाढली आहे. आयसीसीने पत्रकार परिषदेत या स्पर्धेचं अधिकृत वेळापत्रक जाहीर केलं आहे. भारत आणि श्रीलंका येथे संयुक्तरीत्या आयोजित करण्यात आलेला हा 10वा टी-20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. या स्पर्धेतील सामने भारतातील चेन्नई, अहमदाबाद, कोलकत्ता, मुंबई आणि दिल्ली येथे तर श्रीलंकेत कोलंबो आणि कँडी येथे होणार आहेत.
पहिल्यांदाच 20 संघांची स्पर्धा – चार गटांची रचना
या वेळी टी-20 वर्ल्ड कपमध्ये पहिल्यांदाच 20 संघ उतरतील. चार गटांमध्ये प्रत्येकी पाच संघांचा समावेश असेल.
स्पर्धेत सहभागी संघ :
भारत, श्रीलंका, पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान, इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, नामिबिया, युएसए, नेदरलँड, इटली, झिम्बाब्वे, वेस्ट इंडीज, दक्षिण आफ्रिका, नेपाळ, कॅनडा, ओमान आणि आयर्लंड. यातील सर्वात लक्षवेधी सामना भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामध्ये 15 फेब्रुवारी, कोलंबो येथे खेळला जाणार आहे.
भारताचे सामने – तारखा आणि स्थळे
- 7 फेब्रुवारी : भारत vs युएसए – मुंबई
- 12 फेब्रुवारी : भारत vs नामिबिया – दिल्ली
- 15 फेब्रुवारी : भारत vs पाकिस्तान – कोलंबो
- 18 फेब्रुवारी : भारत vs नेदरलँड – अहमदाबाद
प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ सुपर-8 फेरीत प्रवेश करतील. तेथून दोन संघ उपांत्य फेरीत जातील आणि अखेरीस 8 मार्च 2026 रोजी अंतिम सामना खेळला जाईल. भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा या स्पर्धेचा ब्रँड अॅम्बेसेडर असेल, अशी घोषणा आयसीसीचे चेअरमन जय शाह यांनी केली.
रोहित म्हणाला, “इतक्या देशांना टी-20 विश्वचषकात सहभागी होताना पाहणं आनंददायी आहे. आमचे ग्लोबल स्थान वाढत असल्याचा हा पुरावा आहे. मी आता विश्वचषक खेळणार नसल्याने हा वेगळाच अनुभव असेल; घरी बसून सामने पाहण्याची सवय होतेय.” तर भारतीय टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव म्हणाला, “आम्ही या स्पर्धेसाठी खूप उत्सुक आहोत. वर्ल्ड कपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करून देशाला अभिमान वाटेल अशी आम्हाला खात्री आहे.”
या पत्रकार परिषदेला आयसीसीचे चेअरमन जय शाह, रोहित शर्मा, भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर, सूर्यकुमार यादव, आयसीसी आणि श्रीलंका क्रिकेटचे पदाधिकारी उपस्थित होते.
प्रत्येक अंतिम सामना अहमदाबादलाच का?
अंतिम सामना ८ मार्च रोजी, अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. आता यावरूनच शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली आहे. प्रत्येक महत्त्वाचा सामना अहमदाबादलाच का? मुंबईला ऐतिहासिक पार्श्वभूमी असताना तिथे का अंतिम सामना खेळवला जात नाही? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी विचारला आहे.
आगामी टी-20 विश्वचषकातील एक उपांत्य सामना मुंबईत तर दुसरा उपांत्य सामना कोलकाता किंवा श्रीलंकेतील कोलंबो येथे खेळवला जाणार आहे. स्पर्धेची अंतिम लढत अहमदाबादमध्ये होणार आहे. यापूर्वीही एकदिवसीय विश्वचषकाचा अंतिम सामना अहमदाबादमध्येच झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सोशल मीडियावरून आयसीसीला थेट प्रश्न विचारले आहेत. ते म्हणाले, “प्रत्येक मोठा अंतिम सामना अहमदाबादमध्येच का खेळवला जातो? त्या शहराची क्रिकेट परंपरा किंवा ऐतिहासिक पार्श्वभूमी नेमकी काय आहे? मुंबईसारख्या जागतिक दर्जाच्या मैदानात अंतिम सामना का ठेवला जात नाही?”
आदित्य ठाकरे यांनी आयसीसीने राजकारणापासून आणि पक्षपातीपणापासून दूर राहावे, अशी अपेक्षाही व्यक्त केली. ते पुढे म्हणाले, “कोलकात्याचे ईडन गार्डन्स, चेन्नईचे एम.ए. चिदंबरम स्टेडियम, मोहालीचे आय.एस. बिंद्रा स्टेडियम ही सर्व मैदाने टी-20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी परिपूर्ण आहेत. पण अंतिम सामना निवडीमध्ये राजकीय हस्तक्षेप होत असल्याने मुंबईसह काही आयोजक शहरांवर अन्याय होत असल्याची भावना आहे.”

