( नाशिक )
मराठी भाषेचा सर्वांगीण प्रचार आणि प्रसार जागतिक स्तरावर व्हावा, यासाठी चौथे मराठी विश्व संमेलन कवी कुसुमाग्रजांच्या कर्मभूमी असलेल्या नाशिक येथे आयोजित करण्यात आले आहे. २७, २८ फेब्रुवारी आणि १ मार्च २०२६ या कालावधीत हे भव्य संमेलन गंगापूर, नाशिक येथील मराठा महाविद्यालय यांच्या प्रांगणात पार पडणार असल्याची माहिती मराठी भाषा व उद्योग मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.
कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी नाशिकमध्ये मराठीचा जागर
२७ फेब्रुवारी हा दिवस कवी कुसुमाग्रज यांचा स्मृतिदिन तसेच मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. याच पार्श्वभूमीवर मराठी साहित्य, भाषा, संस्कृती आणि कला यांचा जागर करणारे मराठी विश्व संमेलन नाशिकमध्ये होत आहे. मराठी भाषेला दीर्घ परंपरा, समृद्ध साहित्य आणि स्वतंत्र सांस्कृतिक ओळख आहे. या परंपरेचा उत्सव साजरा व्हावा, मराठी संस्कृतीला जागतिक व्यासपीठ मिळावे, अभिजात मराठी साहित्याचे श्रवण व्हावे आणि पारंपरिक कलांचे सादरीकरण व्हावे, या उद्देशाने या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतासह परदेशातील मराठी भाषिकांचे भव्य स्नेहसंमेलन
मराठी विश्व संमेलन हे केवळ साहित्यिक व्यासपीठ नसून भारतातील तसेच भारताबाहेरील मराठी भाषिकांचे एक भव्य स्नेहसंमेलन आहे. विविध उद्योग, कला, संस्कृती आणि विचारांचे आदान-प्रदान घडवून आणणारा हा उपक्रम महाराष्ट्र सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत राबवण्यात येतो. नाशिकमधील हे संमेलन चौथे मराठी विश्व संमेलन ठरणार आहे.
चर्चासत्रे, नाट्यसंगीत आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी
या संमेलनात मराठी भाषा व संस्कृतीवर आधारित विविध चर्चासत्रे, मराठी सांस्कृतिक परंपरेचे दर्शन घडवणारे नाट्यसंगीत, वादन, लोककला आणि अन्य कलांचे सादरीकरण होणार आहे. मराठी संस्कृतीचा वैविध्यपूर्ण ठेवा नागरिकांना अनुभवता येणार आहे. मराठी विश्व संमेलनाची सुरुवात २०२३ साली झाली. २०२३ मध्ये वरळी (मुंबई), २०२४ मध्ये वाशी (मुंबई) आणि २०२५ मध्ये पुणे येथे ही संमेलने यशस्वीरीत्या पार पडली आहेत.
मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
उदय सामंत यांनी सांगितले की, “राज्य सरकारच्या मराठी भाषा विभागामार्फत हे मराठी विश्व संमेलन नाशिकमध्ये होत आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर गोदावरी तीरावर हे संमेलन घेतले जात आहे. आम्ही एकूण चार दिवस उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. संमेलनात ३५ पुरस्कार प्रदान करण्यात येणार असून त्याची अधिकृत घोषणा मुंबईत केली जाईल. नाशिकमधूनही विशेष पुरस्कार दिले जाणार आहेत.”
ते पुढे म्हणाले की, “संमेलनाची खरी सुरुवात २३ फेब्रुवारीपासून होणार आहे. मराठी बोलीभाषांचा संगम, विविध भाषांचे सादरीकरण, भव्य शोभायात्रा यांचे आयोजन करण्यात येणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या उपस्थितीत उद्घाटन होईल.”
या संमेलनामुळे नाशिकमधील स्थानिक नागरिकांना मोठा लाभ होणार असून पर्यटन, सेवा क्षेत्र आणि कार्यक्रम व्यवस्थापनातून रोजगारनिर्मिती होईल, असा विश्वास मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला. विविध परिसंवाद, सांस्कृतिक कार्यक्रम आणि प्रदर्शनांमुळे नाशिक शहर मराठी संस्कृतीच्या जागतिक केंद्रस्थानी येणार आहे.
मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृतीचा जागर करणारे चौथे मराठी विश्व संमेलन नाशिकसाठीच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद ठरणार आहे.

