(चिपळूण)
आज विविध क्षेत्रांमध्ये झपाट्याने बदल होत असताना केवळ बौद्धिक चर्चा पुरेशी ठरणार नाही. तरुणांच्या उपजीविकेचा प्रश्न सुटला नाही, तर देश महासत्ता होण्याची स्वप्ने केवळ कल्पनाच ठरतील. त्यामुळे शिक्षण देताना डोक्याबरोबरच पोटाचाही विचार झाला पाहिजे, अशी ठाम आणि रोखठोक भूमिका प्रा. मिलिंद जोशी यांनी मांडली. तालुक्यातील मांडकी–पालवण येथे कृषिभूषण डॉ. तानाजीराव चोरगे शिक्षण व संशोधन संस्थेच्या वतीने आयोजित राज्यातील पहिल्या ग्रामीण कृषी–सहकार मराठी साहित्य संमेलनाच्या समारोपप्रसंगी ते बोलत होते. तीन दिवस चाललेल्या या संमेलनाचा समारोप रविवारी उत्साहात झाला.
शिक्षण, कृषी आणि सहकार हा ग्रामीण विकासाचा त्रिवेणी संगम
प्रा. जोशी म्हणाले की, शिक्षण, कृषी आणि सहकार हा ग्रामीण विकासाचा खरा त्रिवेणी संगम आहे. महाराष्ट्रात ग्रामीण साहित्य, कृषी आणि सहकार विषयक संमेलने स्वतंत्रपणे होत असली, तरी या तिन्ही विषयांचा एकत्रित विचार करणारे हे संमेलन मैलाचा दगड ठरले आहे. मराठी साहित्य, कथा–कादंबऱ्या आणि चित्रपटांमध्ये सहकार क्षेत्राचे अनेकदा नकारात्मक चित्रण झाले असले, तरी संपूर्ण सहकार चळवळीची प्रतिमा कलुषित करणे योग्य नाही. ग्रामीण अर्थकारण बळकट करण्यात सहकार संस्थांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे.
बेरोजगारी, कर्जबाजारीपणा आणि शेतकऱ्यांचा स्वाभिमान
उच्च शिक्षणानंतरही बेरोजगारीचा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे. केवळ पदवीधर तयार करून चालणार नाही, तर उपलब्ध मनुष्यबळाचे उपयुक्त मनुष्यबळात रूपांतर झाले पाहिजे, असे त्यांनी स्पष्ट केले. शेतकऱ्यांना कर्जपुरवठ्याचे मार्ग असले तरी परतफेडीच्या वेळी अतिवृष्टी, दुष्काळ, आजारपण, शिक्षण व लग्नखर्च अशा अडचणींमुळे ते कर्जाच्या चक्रव्यूहात अडकतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्यांना केवळ नापिकी किंवा कर्जबाजारीपणा कारणीभूत नसून हरवलेला स्वाभिमान आणि सामाजिक उपेक्षा हेही मोठे कारण आहे. जागतिक हिरोंपेक्षा आपल्या मातीतल्या कर्तृत्ववान शेतकऱ्यांच्या यशोगाथा साहित्यात यायला हव्यात, असेही त्यांनी नमूद केले.
परिसंवाद, गौरव आणि प्रेरणादायी अनुभव
रविवार, १५ फेब्रुवारी रोजी ‘कृषी साहित्य व शेती सुधारणा’ आणि ‘आता आत्महत्या थांबवूया’ या विषयांवर परिसंवाद पार पडले. ग्रामीण साहित्यिक तसेच कृषी व सहकार क्षेत्रातील मान्यवरांचा गौरव करण्यात आला. कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे संजय माने, योगेश खराडे, हरिश्चंद्र देसाई आणि डॉ. अकुश चोरमुले यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या प्रयोगशील शेतीच्या आणि यशस्वी वाटचालीच्या कथा उपस्थितांसाठी प्रेरणादायी ठरल्या.

डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत
दैनिक सकाळचे माजी संपादक यमाजी पालकर यांनी डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत घेतली. या मुलाखतीत त्यांनी आपल्या जीवनसंघर्षाचा प्रवास उलगडला. परखड भाष्याबरोबरच मिश्किल शैलीत दिलेल्या उत्तरांनी सभागृहात हास्याची लाट उसळली. आतापर्यंत स्वतःची ४९ पुस्तके प्रकाशित झाल्याची माहिती देत “मी माझं गाव शोधतोय” या विषयावर ५० वे पुस्तक लिहीत असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्य संमेलनाचा उद्देश यशस्वी झाल्याबद्दलही त्यांनी समाधान व्यक्त केले.
ज्ञानासोबत आत्मपरीक्षण आवश्यक : आमदार शेखर निकम
यावेळी आमदार शेखर निकम म्हणाले की, ज्ञान, कष्ट आणि आत्मपरीक्षण यांची सांगड घातल्याशिवाय यश टिकत नाही. ज्ञानामुळे आपण चांगले बोलू शकतो; पण अज्ञानाची जाणीव असेल, तर शिकण्याची तयारी राहते. तरुणांनी मेहनतीवर भर द्यावा आणि शॉर्टकटला थारा देऊ नये, असे त्यांनी आवाहन केले.
दोन महत्त्वाचे ठराव
संमेलनाच्या समारोपात संयोजन समितीचे अध्यक्ष व ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे यांनी दोन महत्त्वाचे ठराव मांडले.
- कसबा येथे छत्रपती संभाजी महाराजांच्या स्मारकासाठी ३०० कोटी रुपयांचा निधी शासनाने तातडीने द्यावा.
- कोकणातील डोंगराळ भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता संचमान्यता धोरण रद्द करून येथील मराठी शाळांना जिवदान द्यावे.
मान्यवरांची उपस्थिती
या समारोप कार्यक्रमाला ज्येष्ठ माजी आमदार पाशा पटेल, पद्मश्री पोपटराव पवार, सागर देशपांडे, कवी अरुण इंगवले, धीरज वाटेकर, राष्ट्रपाल सावंत, कैसर देसाई, सुरेश खापले, सौ. अंजली चोरगे, बाबूराव धोत्रे पाटील, अजय चव्हाण, संतोष गोणबरे, सुभाष लाड, डॉ. संकेत कदम, महेंद्र गावणंग, ज्ञानोबा बोकडे, सचिन तांबेकर, डॉ. शमिका चोरगे, रोशन मोहिरे, प्रा. प्रशांत इंगवले आदी मान्यवर उपस्थित होते. संमेलनात उभारलेल्या विविध स्टॉल्सनाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
ग्रामीण विकासासाठी शिक्षण, कृषी आणि सहकार यांचा एकत्रित विचार मांडणारे हे संमेलन कोकणातील सामाजिक, साहित्यिक आणि कृषी क्षेत्राला दिशा देणारे ठरले.

