(चिपळूण)
चिपळूणच्या गोवळकोट गावाशी नाळ जोडलेली आणि शहराचा अभिमान वाढवणारी फातिमा खालिद मुकादम हिने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दणदणीत पाऊल टाकले आहे. अवघ्या १५ वर्षांच्या वयात फातिमाने Qatar Senior Women’s Cricket Team साठी पदार्पणाचा सामना खेळत इतिहास रचला असून, तिच्या या कामगिरीमुळे चिपळूणचे नाव आंतरराष्ट्रीय क्रीडाविश्वात उजळून निघाले आहे.
मध्यमगती गोलंदाज आणि मधल्या फळीत उपयुक्त फलंदाजी करणारी फातिमा ही कॅप्टन खालिद अब्दुल वहाब मुकादम यांची कन्या आहे. वडिलांचे मूळ गाव गोवळकोट असल्याने, फातिमाचे हे यश केवळ तिच्या कुटुंबापुरते मर्यादित न राहता संपूर्ण चिपळूण शहरासाठी गौरवाचा क्षण ठरले आहे.
लहान वयात आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याची संधी मिळणे हीच तिच्या मेहनतीची, शिस्तीची आणि क्रिकेटवरील निष्ठेची पावती आहे. कतारसारख्या देशाच्या वरिष्ठ महिला संघात स्थान मिळवणे ही बाब भविष्यातील उज्ज्वल कारकिर्दीचे स्पष्ट संकेत देणारी मानली जात आहे. प्रशिक्षक, सहकारी खेळाडू आणि क्रिकेट क्षेत्रातील जाणकारांकडूनही फातिमाच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.
फातिमाच्या या ऐतिहासिक पदार्पणानंतर चिपळूण शहरात आनंदाचे वातावरण आहे. क्रीडाप्रेमी, सामाजिक संस्था, युवक आणि सर्वसामान्य नागरिकांकडून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून, “चिपळूणची मुलगी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चमकली” या भावनेने सर्वत्र अभिमान व्यक्त केला जात आहे.
फातिमा मुकादमचे हे यश ग्रामीण भागातील आणि छोट्या शहरांतील तरुण खेळाडूंना प्रेरणा देणारे ठरत असून, योग्य मार्गदर्शन, कष्ट आणि संधी मिळाल्यास जागतिक स्तरावर पोहोचणे शक्य आहे, हे तिने दाखवून दिले आहे. तिच्या पुढील कारकिर्दीसाठी चिपळूणकरांकडून मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या जात आहेत.

