(गावखडी / वार्ताहर)
“ओम नमः शिवाय” जप करीत “हर हर महादेव” अशी गर्जना करीत हजारो शिवभक्तांंनी गावखडीचे जागृत देवस्थान श्री देव रामेश्वर मंदिरात श्री देव रामेश्वराच्या दर्शनासाठी आज महाशिवरात्री महोत्सवानिमित्त अलोट गर्दी केली होती.
रत्नागिरी तालुक्यातील श्रीदेव रामेश्वर जागृत देवस्थान असून नवसाला पावणारा असल्यानेच मुंबई, पुणे राजापूर रत्नागिरी ठिकठिकाणाहून माहेरवासिणी गावखडी गावाकडे येथे पाच दिवस महाशिवरात्री महोत्सवानिमित्त आलेल्या आहेत.
आज महाशिवरात्री दिवशी 11 खांबांची आणि 21 पायली तांदळाची महापूजा बांधण्यात येते. ही महापूजा बांधण्यासाठी भक्तगण मोठ्या भक्तीभावाने तांदूळ देतात, अशी महापूजा इतरत्र पहावयास मिळणे दुर्मिळ आहे. या तांदूळाने बांधलेली महापूजा भक्तगणांची आकर्षण असते.
त्याचप्रमाणे महाशिवरात्री महोत्सवानिमित्त पाच दिवस विविध क्रीडा स्पर्धा, नाट्यप्रयोग, भजन, कीर्तन, पालखी सोहळा, आरती असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. सतत पाच दिवस म्हणजे 120 तास हा शिवरात्री महोत्सव गावखडी श्रीदेव रामेश्वर मंदिरात साजरा केला जातो.
महाशिवरात्री महोत्सवानिमित्त यावर्षी भाविकांनी अलोट गर्दी करत श्री क्षेत्र गावखडी भक्तीरसात चिंब भिजून गेली आहे. गावखडीतील श्रीदेव रामेश्वराचा शिवरात्री महोत्सव मोठ्या थाटात भक्तीमय वातावरणात श्री देव रामेश्वर उत्सव मंडळाचे अध्यक्ष श्री रविकिरण धर्माजी तोडणकर, श्री देव रामेश्वर देवस्थान विश्वस्त समिती चे अध्यक्ष पद्माकर तोडणकर, मंडळाचे सर्व पदाधिकारी, सर्व शिवभक्त आणि ग्रामस्थ या सर्वांच्या सहकार्याने मोठ्या भक्तीभावात मांगल्य, एकोप्याने मोठ्या दिमाखात आज महाशिवरात्री महोत्सव साजरा होत आहे
फोटो : महाशिवरात्र महोत्सवानिमित्त गावखडीतील जागृत देवस्थान श्रीदेव रामेश्वर मंदिरात आज अकरा खांबाची आणि एकवीस पायली तांदळाची महापूजा बांधण्यात आलेली पहिल्या छायाचित्रात दिसत आहे, तर दुसर्या छायाचित्रात श्रीदेव रामेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांची रीघ लागली आहे.
(छाया : दिनेश पेटकर, गावखडी)

