(रत्नागिरी)
शहरात दिवसेंदिवस चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे. ग्रामीण भागातून चोरट्याची टोळ्या शहरात सक्रिय झाल्याची चिन्हे दिसू लागली आहे. काही दिवसापूर्वी शहरात खासगी कार्यालये फोडण्याच्या घटना घडल्या आहेत. पण शुक्रवारी (ता. २७) भर दिवसा खोली भाड्याने मिळेल का विचारुन चक्क वृद्ध महिलेला घरात कोंडून तिच्याकडून दागिने हिसकावून घेऊन चोरट्यांनी पोबारा केल्याची घटना राधाकृष्ण नाका परिसरात घडल्याने एकच खळबळ उडाली.
शहरातील राधाकृष्ण टॉकीज समोरील दत्त कॅफे च्या पाठीमागील बाजूला एक वृद्ध महिला एकटीच राहत आहे. शुक्रवारी सकाळी नउच्या सुमारास घर भाड्याने आहे का? म्हणून एक जोडपं चौकशीसाठी आले होते. तसेच गेले दोन-चार दिवस दोन पुरुष त्या ठिकाणी फिरत असल्याची चर्चा होती. मात्र शुक्रवारी रेकी करून या वृद्ध महिलेच्या हातातील दागिने चोरून नेण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. शुक्रवारी सकाळी नऊ वाजण्याचे सुमारास ती वृद्ध महिला बाजूला गेली होती. तिच्या घराचा दरवाजा उघडा होता. त्यावेळी आत मध्ये एक नवरा बायको जोडपं शिरलं. त्यानंतर घराची मालकीण वृद्ध महिला घरात गेली आणि तिच्या पाठोपाठ एक पुरुष गेला आणि आतून पुढच्या व मागच्या दोन्ही दारांचे दरवाजे लावल्यामुळे त्या महिलेचे तोंड दाबून तिच्याकडचे सगळे सोन्याचे दागिने काढून घेतले. मात्र वृद्ध महिलेच्या हातातील एक बांगडी न आल्याने मिळेल तेवढं घेऊन या चोरट्याने पोबारा केल्याची धक्कादायक प्रकार पुढे आला आहे.
दरम्यान या चोरीची माहिती मिळताच शहर पोलिस निरीक्षक महेश तोरसकर आपल्या टीमसह दाखल झाले होते. ज्या जागी चोरी झाली त्या आजूबाजूला सीसीटीव्ही असल्यामुळे लवकरच पोलिसांना याबाबत चोर मिळतील असे म्हटले जाते. मात्र ज्या ठिकाणी घटना घडली आणि ज्या वृद्ध महिलेवर प्रसंग घडला ती आजारी पडली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे रात्री उशिरा चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.