(चिपळूण / वार्ताहर)
ग्रामीण, कृषी व सहकार क्षेत्रातील विचारमंथनासाठी आयोजित साहित्य संमेलनात आज रविवार, दिनांक १५ फेब्रुवारी रोजी एक विशेष आकर्षण ठरणार आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष तसेच रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांची प्रकट मुलाखत सकाळी १०.०० ते ११.०० या वेळेत आयोजित करण्यात आली आहे.
ही प्रकट मुलाखत दै. सकाळचे माजी संपादक यमाजी मालकर घेणार असून, ग्रामीण विकास, शेती क्षेत्रातील सध्याची आव्हाने, सहकार चळवळीची दिशा, तसेच ग्रामीण महाराष्ट्राच्या भविष्यातील संधी या विषयांवर सखोल चर्चा अपेक्षित आहे. दीर्घ अनुभव, प्रशासकीय जाण आणि सामाजिक बांधिलकी यांचा मिलाफ असलेला हा संवाद उपस्थितांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने सकाळी ९.०० वाजल्यापासून संपूर्ण दिवसभर विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे. या परिसंवादांमध्ये ज्येष्ठ साहित्यिक, अभ्यासक, कृषी व सहकार क्षेत्रातील जाणकार आपले विचार मांडणार आहेत. ग्रामीण जीवन, शेती संस्कृती, सहकार चळवळ आणि सामाजिक परिवर्तन या विषयांवर सखोल मंथन होणार असून, शेतकरी, सहकार कार्यकर्ते, विद्यार्थी, अभ्यासक आणि साहित्यप्रेमींसाठी हे संमेलन विचारांची मेजवानी ठरणार आहे.
आयोजकांच्या वतीने शेती व सहकार क्षेत्रात कार्यरत असलेले सर्व कार्यकर्ते, संस्था प्रतिनिधी आणि नागरिकांनी सकाळी ९.०० वाजल्यापासून उपस्थित राहून प्रकट मुलाखतीसह सर्व परिसंवादांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासाची दिशा ठरवणाऱ्या विचारांना प्रत्यक्ष ऐकण्याची ही दुर्मीळ संधी असल्याने मोठ्या उपस्थितीची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

