(मुंबई)
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्यावर मुंबईतील आझाद मैदान पोलीस ठाण्यात सरकारी कामात अडथळा आणल्याचा आणि पोलीस अधिकाऱ्याशी गैरवर्तन केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी यासंदर्भात अधिकृत तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण प्रकरणाची पार्श्वभूमी काही दिवसांपूर्वी विधिमंडळात घडलेल्या गोंधळाशी संबंधित आहे. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या समर्थकांमध्ये विधान भवनाच्या लॉबीत जोरदार धक्काबुक्की आणि हाणामारी झाली होती. या प्रकरणानंतर आमदार नितीन देशमुख यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. याच अटकेविरोधात आमदार रोहित पवार थेट आझाद मैदान पोलीस ठाण्यात गेले आणि पोलिसांशी वाद घातला.
नेमकं काय घडलं?
नितीन देशमुख यांच्या अटकेनंतर रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड पोलीस ठाण्यात कार्यकर्त्याची भेट घेण्यासाठी गेले होते. मात्र, संबंधित कार्यकर्ता पोलीस ठाण्यात नसल्याचं पोलिसांनी सांगितलं. यावरून रोहित पवार आणि पोलिसांमध्ये वाद झाला. या वादात रोहित पवार यांनी पोलिसांवर आवाज चढवत, “शहाणपणा करू नका. बोलता येत नसेल, तर गप्प बसा. आवाज खाली ठेवा. हातवारे करून आमदारांशी बोलू नका,” अशा शब्दांत अधिकाऱ्यांना सुनावलं.
या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला आहे. त्यात रोहित पवार पोलीस अधिकाऱ्यांना दमदाटी करताना स्पष्ट दिसत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या समर्थकांनीही तीव्र आक्रमक भूमिका घेतल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते.