(मुंबई)
गेल्या काही महिन्यांतील अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. राज्यात जवळपास ६० लाख हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या पार्श्वभूमीवर आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्त्वाची घोषणा केली.
“मॅन्युअलमध्ये ‘ओला दुष्काळ’ ही संकल्पना नाही, तरीही दुष्काळासारख्याच सर्व सवलती शेतकऱ्यांना लागू करण्यात येतील. दिवाळीपूर्वी मदत थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचेल,” असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
आतापर्यंत झालेल्या नुकसानीसाठी शासनाने २,२१५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे वितरण सुरू आहे. ई-केवायसीची अट रद्द करून थेट शेत नोंदीप्रमाणेच मदत दिली जाणार आहे. पुढील २-३ दिवसांत अंतिम आकडेवारी जमा झाल्यानंतर जमिनी खरडून जाणे, विहिरींचे नुकसान, घरांचे नुकसान आदींसाठी स्वतंत्र मदत धोरण आखले जाणार आहे.
केंद्र सरकारकडून मदत निश्चित मिळेल, परंतु त्याची वाट न पाहता राज्य सरकार स्वतःची मदत तात्काळ वितरीत करत असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले. “संपूर्ण नुकसानीचा आढावा घेऊन केंद्राला एकच प्रस्ताव पाठवला जाईल,” असे ते म्हणाले.

