(मुंबई)
भारतीय संगीतविश्वाला मोठा धक्का बसला असून पद्मविभूषण, महाराष्ट्र भूषण ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचे रविवारी (12 एप्रिल) दुपारी निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या जाण्याने बॉलिवूडसह संपूर्ण भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. प्रकृती अस्वास्थ्यामुळे शनिवारी रात्री त्यांना तातडीने ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान मल्टिपल ऑर्गन फेल्युअरमुळे त्यांचे निधन झाल्याची अधिकृत माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली.
आज होणार अंत्यसंस्कार
आशा भोसले यांचे पार्थिव आज (13 एप्रिल) सकाळी 11 ते दुपारी 3 वाजेपर्यंत कासा ग्रॅंडे को-ऑप. हाऊसिंग सोसायटी, सेनापती बापट मार्ग, लोअर परेल, मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती त्यांचे सुपुत्र आनंद भोसले यांनी दिली.
दिग्गजांकडून श्रद्धांजली
अनेक दिग्गज नेतेमंडळी, कलाकार येथे जाऊन आशाताईंचे अंत्यदर्शन घेतले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह मंत्री आशिष शेलार, आमदार प्रसाद लाड, मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे, मनसेप्रमुख राज ठाकरे आणि अमित ठाकरे, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्यासह अनेक नेत्यांनी तसेच प्रसिद्ध गायक जावेद अख्तर, अभिनेत्री शबाना आजमी तसेच दिग्गज अभिनेता जॅकी श्रॉफ आशा भोसले यांच्या घरी अंत्यदर्शन घेतले.
आपल्या सुरांनी रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या आशा भोसले यांनी लहान वयातच आपल्या कलेची छाप पाडली होती. वयाच्या केवळ 10 व्या वर्षी 1943 मध्ये पहिले गाणे गाऊन त्यांनी आपल्या प्रवासाची सुरुवात केली, त्यानंतर 1948 मध्ये हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करत त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. वयाच्या 90 नंतरही त्यांची ऊर्जा आणि संगीतावरील प्रेम कायम होते. 92 व्या वर्षीही त्यांनी शेवटचे गाणे रेकॉर्ड करत आपली न थांबणारी जिद्द सिद्ध केली. ‘चला चला नव बाळा’ पासून ते ‘द शॅडो लाइट’ पर्यंतचा त्यांचा प्रवास हा केवळ गाण्यांचा नाही, तर प्रेरणा देणाऱ्या आयुष्याचा एक अद्भुत प्रवास ठरला आहे.
संगीतातील अष्टपैलू दिग्गज
8 सप्टेंबर 1933 रोजी सांगली येथे जन्मलेल्या आशा भोसले या मंगेशकर कुटुंबातील होत्या. त्यांचे वडील पंडित दीनानाथ मंगेशकर हे प्रख्यात गायक-अभिनेते होते. बालवयातच त्यांनी संगीताचे धडे घेतले आणि अवघ्या 10 व्या वर्षी मराठी चित्रपट ‘माझं बाळ’ मधून ‘चला चला नव बाळा’ या गाण्याने कारकिर्दीची सुरुवात केली. सुमारे आठ दशकांच्या कारकिर्दीत त्यांनी हिंदी, मराठी, बंगाली, तमिळ, तेलुगू यांसह 20 पेक्षा अधिक भाषांमध्ये 12 हजारांहून अधिक गाणी रेकॉर्ड केली. ‘दम मारो दम’, ‘पिया तू अब तो आजा’, ‘चुरा लिया है तुमने’, ‘इन आँखों की मस्ती’ यांसारखी त्यांची गाणी आजही लोकप्रिय आहेत.
पुरस्कार आणि गौरव
आशा भोसले यांना दादासाहेब फाळके पुरस्कार (2000), पद्मविभूषण (2008) यांसारखे सर्वोच्च सन्मान मिळाले. त्यांच्याकडे सर्वाधिक गाणी रेकॉर्ड करणाऱ्या कलाकाराचा गिनीज वर्ल्ड रेकॉर्डही आहे. त्यांच्या अष्टपैलू गायकीमुळे त्या ‘क्वीन ऑफ इंडीपॉप’ म्हणूनही ओळखल्या जात.
संघर्षातून घडलेलं व्यक्तिमत्त्व
वैयक्तिक आयुष्यात अनेक चढ-उतारांचा सामना करूनही त्यांनी संगीताची साथ कधी सोडली नाही. प्रसिद्ध संगीतकार R. D. Burman यांच्यासोबतची त्यांची जोडी विशेष गाजली. विविध संगीत प्रकारांमध्ये सहजपणे स्वतःला जुळवून घेण्याची त्यांची क्षमता त्यांना इतरांपेक्षा वेगळी ठरवत होती.
“या” गाण्यासाठी राहिली होती हुरहूर
सूरसम्राज्ञी आशा भोसले यांनी आपल्या बहारदार आवाजाने विविध भाषांतील हजारो गाण्यांमधून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं. अनेक चित्रपट त्यांच्या गाण्यांमुळे सुपरहिट ठरले. मात्र, इतकी प्रदीर्घ आणि यशस्वी कारकीर्द असूनही त्यांच्या मनात एका खास गाण्याला स्वतःचा आवाज देण्याची एक इच्छा अपुरीच राहिली होती. ही खंत त्यांनी स्वतः एका मुलाखतीत व्यक्त केली होती. त्या म्हणाल्या होत्या, “मी आयुष्यात जवळपास सर्व प्रकारची गाणी गायली आहेत. पण एक गाणं असं आहे, जे मला गायलं असतं असं वाटतं.”
त्या गाण्याचा उल्लेख करताना त्यांनी सांगितलं की, “तुम जो हुए मेरे हमसफर, जस्ते बदलकर लाखों दी तेरे प्यार की, आखो मे जल गए” या गीताला मी वेगळ्या पद्धतीने सादर करू शकले असते, अशी त्यांची भावना होती. “हे गाणं मी गायलं असतं, तर मी ते अधिक वेगळ्या आणि भावपूर्ण शैलीत सादर केलं असतं,” अशी प्रामाणिक प्रतिक्रिया त्यांनी दिली होती.
संगीतातील अष्टपैलुत्व, प्रयोगशीलता आणि भावनांची सूक्ष्म जाण यासाठी ओळखल्या जाणाऱ्या आशा भोसले यांच्या या वक्तव्यातून त्यांच्या कलेबद्दलची ओढ आणि परिपूर्णतेची जाणीव स्पष्ट दिसून येते. आज त्या आपल्या सोबत नसल्या तरी त्यांच्या सुरेल आठवणी आणि अशा अनकथित इच्छा रसिकांच्या मनात कायम घर करून राहतील. त्यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वाने एक अजरामर आवाज गमावला असला, तरी त्यांच्या सुरांचा वारसा कायमच रसिकांच्या मनात जिवंत राहणार आहे.

