(चिपळूण / सचिन घाणेकर)
तालुक्यातील कळंबट येथे शनिवारी (२० सप्टेंबर) रात्री साडेसातच्या सुमारास ग्रामपंचायत तंटामुक्ती अध्यक्ष तुषार शिरकर व त्यांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केला. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून मुलगा थोडक्यात बचावला आहे.
तुषार शिरकर हे मार्गताम्हाणे येथून मोटारसायकलने घरी परतत होते. कळंबट बौद्धवाडीत पोहोचताच अचानक बिबट्याने रस्त्यावर झडप घालून हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या मागे मोटारसायकलवर बसलेला मुलगा बिबट्याच्या पंजाला सापडला. प्रसंगावधान राखून शिरकर यांनी मोटारसायकल वेगाने पुढे धावत नेली, अन्यथा गंभीर दुर्घटना घडली असती. मुलाच्या पायाला, अंगावर नखे लागल्याने किरकोळ जखम झाली असून त्याला तत्काळ वहाळ प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले आहे.
हल्ल्यापूर्वी अवघ्या काही मिनिटांपूर्वी हाच बिबट्या घवाळ गावचे पोलीस पाटील सुनील बळकटे यांच्यावरही झडप घालण्याच्या तयारीत होता. सुदैवाने ते देखील वाचले.
गेल्या काही दिवसांपासून कळंबट परिसरात बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. त्याने याआधीही गावातील बकऱ्या, गुरे व कुत्र्यांवर हल्ला करून शेतकऱ्यांचे नुकसान केले आहे. वाढलेल्या झाडीमुळे व जंगलतोडीमुळे बिबटे रस्त्यालगत फिरताना दिसत आहेत.
या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

