(गणपतीपुळे / वैभव पवार)
बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखा रत्नागिरी आणि संस्कार समिती रत्नागिरी यांच्या संयुक्त विद्यमाने वर्षावास कालखंड २०२६ अंतर्गत आयोजित धम्मप्रवचन मालिकेचा सांगता समारंभ रविवार, २५ ऑक्टोबर रोजी फणसोप बौद्धवाडी येथील शांतिदूत बुद्धविहारात होणार आहे. सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत आयोजित या कार्यक्रमात मुंबई येथील बौद्ध धम्मगुरू भंते मिलिंद बोधी यांची प्रमुख उपस्थिती असून, त्यांची धम्मदेसना लाभणार आहे.
आषाढ पौर्णिमा ते अश्विन पौर्णिमा या कालावधीत आयोजित वर्षावासानिमित्त तालुक्यातील विविध गाव शाखांमध्ये धम्मप्रवचन मालिकेचे नियोजनबद्ध आयोजन करण्यात आले होते. या मालिकेची सांगता फणसोप बौद्धवाडी येथे होणार असून, बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक २४, रमाई महिला मंडळ, बाळ राहुल मंडळ आणि आम्रपाली उपासिका यांच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
फणसोप शाखेचे अध्यक्ष मिलिंद गणपत कांबळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारंभाची सुरुवात धम्मध्वजारोहण, मानवंदना, धम्मध्वज गौरवगाथा पठण, बुद्धवंदना, याचना तसेच त्रिसरण-पंचशील ग्रहणाने होईल. त्यानंतर भंते, मान्यवर आणि धम्मप्रवचन मालिकेतील प्रवचनकारांचा सत्कार व अभिनंदन करण्यात येणार आहे. संस्कार समितीचे अध्यक्ष आणि तालुका शाखेचे अध्यक्ष मनोगत व्यक्त करून शुभेच्छा देतील. त्यानंतर भंते मिलिंद बोधी यांची धम्मदेसना होईल. कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी धम्मदान व चिवरदान, अध्यक्षीय मनोगत, आभारप्रदर्शन आणि सरणत्तय होणार आहे.
या कार्यक्रमाला बौद्धजन पंचायत समिती तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार, उपाध्यक्ष तथा संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे, चिटणीस सुहास कांबळे, उपचिटणीस शशिकांत कांबळे, कोषाध्यक्ष मंगेश सावंत आणि संस्कार समितीचे चिटणीस रविकांत पवार उपस्थित राहणार आहेत. याशिवाय तालुका शाखेअंतर्गत असलेल्या विविध उपसमित्यांचे प्रमुख पदाधिकारी व सदस्य, श्रामणेर, बौद्धाचार्य आणि गाव शाखांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
या धम्मप्रवचन मालिका सांगता समारंभाला धम्मबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन फणसोप शाखेचे अध्यक्ष मिलिंद कांबळे, तालुका शाखेचे अध्यक्ष प्रकाश पवार आणि संस्कार समितीचे अध्यक्ष विजय आयरे यांनी केले आहे.


