(चिपळूण / रत्नागिरी)
मोबाइल टॉवरच्या उभारणीचे काम सुरू असताना महावितरणच्या विद्युत वाहिनीवर आकडा टाकून वीज वापरल्याचा प्रकार तालुक्यातील टेरव येथे उघडकीस आला आहे. महावितरणच्या चिपळूण विभागीय कार्यालयातील भरारी पथकाने मंगळवारी (१४ ऑक्टोबर) सकाळी १०.५० वाजता केलेल्या पाहणीत हा प्रकार समोर आला. या प्रकरणी संबंधितांवर दंडात्मक कारवाईची प्रक्रिया सुरू असून, दंडाची रक्कम न भरल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान, या प्रकरणात स्थानिक वायरमनविरोधातही ग्रामस्थांनी तक्रार केल्याने प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
टेरव येथे १४ ऑक्टोबर रोजी पिकअप शेडजवळ मोबाइल कंपनीच्या टॉवर उभारणीचे काम सुरू होते. भरारी पथकाने सकाळी १०.५० वाजता घटनास्थळी पाहणी केली असता, टॉवरच्या खाली वेल्डिंगचे काम सुरू असल्याचे दिसून आले. तसेच तेथे लहान हँड ग्राइंडरही सुरू होता. मात्र, या ठिकाणी महावितरणचा विद्युत मीटर आढळून आला नाही. अधिक तपासणी केली असता, जवळच्या विद्युत खांबावरून आकडा टाकून अनधिकृतपणे वीजजोडणी घेतल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. भरारी पथकाने केलेल्या चौकशीत १३ ऑक्टोबर रोजी ही अनधिकृत जोडणी करण्यात आल्याचे समोर आल्याची माहिती देण्यात आली. त्यानुसार संबंधितांकडून वीजचोरीबाबत दंड वसूल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. भारतीय विद्युत अधिनियम, २००३ मधील कलम १३५ नुसार दंडात्मक रक्कम न भरल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याची कारवाई केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेचा पंचनामाही करण्यात आला आहे.
या प्रकरणात टेरव येथे कार्यरत असलेले वायरमन ओंकार मालप यांच्याविरोधातही ग्रामस्थांनी महावितरणकडे तक्रार दाखल केली आहे. १३ ऑक्टोबर रोजी ग्रामस्थांनी मालप यांच्याकडे या वीजजोडणीबाबत विचारणा केली असता, महावितरणकडून तात्पुरता मीटर देण्यात आल्याचे त्यांनी सांगितल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी भरारी पथकाच्या पाहणीवेळी घटनास्थळी मीटर आढळला नसल्याने ग्रामस्थांनी या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी केली आहे. वायरमन मालप यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी टेरव येथील सविता कदम यांनी निवेदनाद्वारे केली आहे. तथापि, या तक्रारीतील आरोपांची स्वतंत्र पडताळणी होणे आवश्यक आहे.
महावितरणच्या भरारी पथकाचे प्रमुख अतिरिक्त कार्यकारी अभियंता अनिलकुमार डोंगरे, सहायक अभियंता राजेंद्र रासकर, प्रवीण फाळके आणि अक्षय जाधव यांनी ही कारवाई केली. आता या प्रकरणात संबंधितांवर कोणती कारवाई होते आणि वायरमनविरोधातील तक्रारीची महावितरणकडून कशी दखल घेतली जाते, याकडे लक्ष लागले आहे.


