(मुंबई)
महाराष्ट्र हाऊसिंग अँड एरिया डेव्हलपमेंट अथॉरिटी (Mhada) मधील एका निवृत्त इंजिनीअरवर डिजिटल सेक्सटॉर्शन आणि ऑनलाइन फसवणुकीचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे. या हाय-प्रोफाईल सायबर गुन्ह्यामुळे पोलीस प्रशासनही चकित झाले आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, काव्या शर्मा नावाची महिला आणि तिच्या टोळीने गुंतवणुकीच्या नावाखाली निवृत्त अधिकाऱ्याचा विश्वास जिंकला आणि नंतर त्यांच्या नग्न फोटोंद्वारे ब्लॅकमेल करून सुमारे 4 कोटी रुपये घेतले.
या प्रकरणाची सुरुवात जुलै 2025 मध्ये झाली, जेव्हा पीडित इसमाला एका अनोळखी नंबरवरून आकर्षक गुंतवणूक योजना बद्दल मेसेज आला. स्वतःला ‘इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर’ सांगणाऱ्या महिलेने विदेशी ट्रेडिंग प्लॅटफॉर्मवर मोठा नफा मिळवून देण्याचे आमिष दाखवले. सुरुवातीच्या गुंतवणुकीवर काही रिटर्न दाखवून, आरोपीने निवृत्त अधिकाऱ्याचा विश्वास संपादन केला. जुलै 2025 ते जानेवारी 2026 दरम्यान, निवृत्त अधिकाऱ्याने वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये सुमारे 2 कोटी रुपये गुंतवले.
गुंतवणूक परत मागितल्यावर ब्लॅकमेलिंग
जेव्हा अधिकाऱ्याने गुंतवणुकीची रक्कम मागितली, तेव्हा आरोपीने व्हिडिओ कॉलवर विवस्त्र होण्यास भाग पाडून फोटो घेणे सुरू करत त्यांचे आक्षेपार्ह फोटो मिळवले. हे ओपेन फोटो गुंतवणुकीची रक्कम रिलीज करण्यासाठी आयडेंटिटी व्हेरिफिकेशनसाठी गरजेचे असल्याचे सांगून अधिकाऱ्याला दबावाखाली आणण्यात आले.
सेक्सटॉर्शन आणि धमक्या
आयुष्यभराची कमाई गेल्यानंतर घाबरलेल्या अवस्थेत आणि आपली जमापुंजी बुडण्याच्या भीतीने 62 वर्षीय निवृत्त अधिकाऱ्याने आरोपीची अट मान्य केली. फोटो मिळताच हे प्रकरण सेक्सटॉर्शन आणि खंडणीमध्ये बदलले निवृत्त अधिकाऱ्याने फोटो मिळाल्यानंतर सेक्सटॉर्शन आणि खंडणी सहन केली. 25 जानेवारी रोजी एका व्यक्तीने फोन करून आपण त्या महिलेचा नातेवाईक असल्याचे सांगत धमकी दिली की, “अधिक पैसे दिले नाहीत तर बलात्कार आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल केले जातील.”
भयभीत अधिकाऱ्याने आरोपींना आणखी 2 कोटी रुपये दिले, परिणामी एकूण फसवणुकीची रक्कम 4 कोटी रुपये झाली. आरोपी सातत्याने पैशांची मागणी करत असल्यामुळे, निवृत्त अधिकाऱ्याने अखेर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलीस आता बँक खात्यांची, मोबाईल नंबरांची आणि डिजिटल प्लॅटफॉर्मची तांत्रिक चौकशी करत आहेत, तसेच आरोपींचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक तपास सुरू आहे.

