(मुंबई)
राज्यातील महायुती सरकारने यंदा आमदार निधी वितरणात भाजपच्या आमदारांना सर्वाधिक प्राधान्य दिले आहे. एकूण ३६ आमदारांपैकी २१ आमदारांना ३१७.५६ कोटी रुपये विकास निधी मंजूर झाला, त्यापैकी भाजपच्या १४ आमदारांचा समावेश आहे. शिवसेनेला ६, तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त एका आमदाराला निधी मिळाला. विशेष म्हणजे, राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या पक्षातील फक्त एका आमदाराला निधी मंजूर झाला आहे.
भाजपचे आमदार निधीचे मानकरी
यंदा प्रत्येक आमदाराला १७.५० कोटी रुपये निधी निश्चित होता. त्यापैकी १० आमदारांना पूर्ण निधी, तर ९ आमदारांना प्रत्येकी १२.५० कोटी रुपये मंजूर झाले.
मुख्य लाभार्थी भाजपचे आमदार:
- पराग अळवणी, राम कदम, विद्या ठाकूर, मिहिर कोटेचा, योगेश सागर, प्रवीण दरेकर – प्रत्येकी १७.५० कोटी
- अतुल भातखळकर – १४.५६ कोटी
- मनीषा चौधरी, संजय उपाध्याय, अमित साटम, कॅप्टन तमिल सेल्वन, राहुल नार्वेकर, कालिदास कोळंबकर, राजहंस सिंग – प्रत्येकी १२.५० कोटी
शिवसेनेला दुसऱ्या क्रमांकावर निधी
शिवसेनेच्या ६ आमदारांना एकूण ९८ कोटी रुपये मंजूर झाले.
- तुकाराम काते, मुरजी पटेल, प्रकाश सुर्वे, अशोक पाटील – प्रत्येकी १७.५० कोटी
- दिलीप लांडे – १५.५० कोटी
- मंगेश कुडाळकर – १२.५० कोटी
राष्ट्रवादीला ठेंगा; फक्त एका आमदाराला निधी
अजित पवार यांच्या पक्षातील एकच आमदार सना मलिक यांना १२.५० कोटी रुपये मंजूर झाले.
आमदारांनी सुचवलेल्या विकासकामांना पालकमंत्र्यांच्या शिफारशीवर निधी मंजूर केला जातो. यंदा ‘लाडकी बहीण’ योजनेमुळे अर्थ खात्यावर ताण असून, काही आमदारांनी निधीअभावी तक्रारी केल्या होत्या. त्यानंतर सरकारने विशेष तरतूद करून २१ आमदारांना निधी उपलब्ध करून दिला. उर्वरित १५ आमदारांना अद्याप निधीची प्रतीक्षा आहे.
यंदाच्या निधी वितरणात भाजपची आघाडी आणि राष्ट्रवादीला कमी निधी मिळाल्याने महायुतीतील अंतर्गत राजकारण पुन्हा चर्चेत आले आहे.

