(संगमेश्वर / एजाज पटेल)
कोंडये गावचे सुपुत्र, सर्वांच्या जिव्हाळ्याचे आणि प्रेमाचे नाते जपणारे शशिकांत देसाई (वय ८२ वर्षे) यांचे मुंबई येथे रविवार, दि. ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आकस्मिक निधन झाले. २५ ऑगस्ट १९४३ रोजी जन्मलेल्या शशिकांत देसाई यांच्या निधनाची बातमी मुंबईहून कोंडये गावात पोहोचताच गावासह संपूर्ण खाडी भागावर शोककळा पसरली असून, सर्वत्र तीव्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
नोकरी निमित्ताने अनेक वर्षे मुंबई येथे वास्तव्यास असले तरी त्यांचे मन आणि ओढ कायम आपल्या जन्मगावाकडेच होती. शासकीय सेवेत कार्यरत असताना त्यांनी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे आणि निष्ठेने पार पाडली. कर्तव्य, आपुलकी आणि माणुसकी या मूल्यांवर त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जगले.
सेवानिवृत्तीनंतर त्यांचा गावाशी असलेला ऋणानुबंध अधिक दृढ झाला होता. सण-उत्सव, पारंपरिक कार्यक्रम, धार्मिक विधी किंवा कोणताही आनंदाचा क्षण असो ते न चुकता कोंडये गावी उपस्थित राहत असत. मुंबईत वास्तव्यास असूनही गावातील प्रत्येक घडामोडीबाबत त्यांना विशेष आपुलकी होती. शशिकांत देसाई हे अत्यंत दिलखुलास, हौशी आणि प्रेमळ स्वभावाचे होते.
त्यांचा मोठा पण मधुर आवाज, धडधकट शरीरयष्टी, पांढरी शुभ्र दाढी आणि डोक्यावर कायम असलेली हॅट हा त्यांचा खास रुबाब सर्वांच्या स्मरणात कायम राहणारा आहे. लहानांपासून वृद्धांपर्यंत प्रत्येकजण त्यांना आपुलकीने “भाई” म्हणूनच हाक मारत असे. त्यांच्या एका हाकेत आणि संवादात समोरच्याला आपलेपणाची ऊब मिळत असे.
त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, मित्रपरिवार, नातेवाईक तसेच संपूर्ण कोंडये गावाने आपला एक जिव्हाळ्याचा माणूस गमावला आहे. “आपल्या माणसांपैकी एक” अशी भावना प्रत्येकाच्या मनात होती. त्यामुळे आज कोंडये गावात आणि संपूर्ण खाडी भागात शोकमग्न वातावरण असून, डोळ्यांत अश्रू आणि मनात तीव्र हळहळ आहे.
शशिकांत देसाई यांचे जाणे म्हणजे केवळ एका व्यक्तीचे निधन नव्हे, तर प्रेमळ शब्द, आपुलकीचा स्पर्श आणि नाती जपणारे एक व्यक्तिमत्त्व काळाच्या पडद्याआड जाणे आहे. त्यांच्या आठवणी, त्यांचा आवाज आणि त्यांचे प्रेम सदैव सर्वांच्या स्मरणात जिवंत राहील.

