(रत्नागिरी / विशेष प्रतिनिधी)
तालुक्यातील हातखंबा–पाली जिल्हा परिषद गटातील निवडणूक यंदा केवळ स्थानिक स्वराज्य संस्थेपुरती मर्यादित न राहता, थेट पालकमंत्री उदय सामंत यांच्या राजकीय प्रतिष्ठेची लढत ठरत आहे. महायुतीकडून उतरवण्यात आलेल्या उमेदवारावर पालकमंत्र्यांनी पूर्ण ताकद पणाला लावल्याने, या गटातील लढतीला ‘हायहॉल्टेज’ स्वरूप प्राप्त झाले आहे. पालकमंत्री उदय सामंत यांचे होमग्राउंड मानल्या जाणाऱ्या हातखंबा–पाली गटाची ही निवडणूक केवळ औपचारिक प्रक्रिया न राहता, अत्यंत रंगदार, प्रतिष्ठेची आणि हायहॉल्टेज राजकीय लढत बनली आहे. सत्ताधारी नेतृत्वाची कसोटी, स्थानिक नाराजी, जातीय व संघटनात्मक समीकरणे आणि तिरंगी संघर्ष यामुळे या गटातील सामना जिल्ह्यातील सर्वाधिक लक्षवेधी ठरणार आहे.
अनुसूचित जातीसाठी आरक्षित असलेल्या या गटात उमेदवारीवरून सुरुवातीपासूनच मोठी रस्सीखेच पाहायला मिळाली. अनेक इच्छुक कार्यकर्त्यांची नावे चर्चेत असताना, अखेर सुयोग कांबळे यांच्यावर शिक्कामोर्तब करण्यात आल्यानंतर परशुराम कदम यांच्यासह त्यांच्या गटाचा हिरमोड झाला. या नाराजीतून कदम यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी स्वीकारल्याने लढत तिरंगी झाली आणि सत्ताधाऱ्यांसमोर अनपेक्षित आव्हान उभे राहिले.
प्रचारादरम्यान या निवडणुकीत जातीय समीकरणे, ग्रामस्तरावर विकासात्मक कामे, कार्यकर्त्यांची नाराजी व एकजूट, मतविभाजनाचा फॅक्टर हे मुद्दे चर्चेच्या केंद्रस्थानी राहिले. तसेच, दोन उमेदवार हातखंबा परिसरातील तर एक उमेदवार थेट पालकमंत्र्यांच्या गावातील असल्याने या मुद्द्यावरूनही प्रचारात दबक्या आवाजात टोलेबाजी झाली. दरम्यान, प्रचाराच्या अंतिम टप्प्यात शिवसेना पक्षाने पक्षशिस्तीचा धाक दाखवत बंडखोरी करणाऱ्या व उमेदवारी अर्ज मागे न घेतल्यामुळे परशुराम कदम यांची पक्षातून हकालपट्टी केली. या निर्णयामुळे राजकीय वातावरण अधिक तापले, मात्र या घडामोडींचा थेट परिणाम मतदानावर होईल का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
यापूर्वी सत्ताधारी शिवसेनेत सक्रिय असलेले परशुराम कदम यांचे राजकीय अस्तित्वही या निवडणुकीत मतविभाजनास कारणीभूत ठरण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांपैकी काही घटक कदम यांच्या बाजूने वळण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने, याचा थेट फटका शिंदेंच्या शिवसेनेला बसू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळे हातखंबा–पाली गटातील तिरंगी लढतीत मतांचे गणित अधिक गुंतागुंतीचे बनले आहे. ही निवडणूक सामंत यांच्यासाठी ‘प्रतिष्ठेची’ बनल्याचे चित्र आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीच्या पाठबळासह स्थानिक मुद्द्यांवर भर देत वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मुकुंद सावंत यांनी मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केल्याने, ही लढत केवळ दोन उमेदवारांपुरती मर्यादित न राहता अधिक रंगतदार बनल्याचे चित्र दिसून येत आहे. दोन उमेदवारांमधील संघर्षाचा फायदा वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मुकुंद सावंत यांना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मतविभाजन, सत्ताधाऱ्यावरील स्थानिक नाराजी आणि संघटनात्मक ताकद यामुळे सावंत यांची भूमिका ‘डार्क हॉर्स’ म्हणून पाहिली जात आहे.
एकूणच पाहता, तिन्ही प्रमुख उमेदवार एकमेकांना कडवी टक्कर देऊ शकतील, असेच सध्याचे चित्र आहे. प्रचारातील आरोप–प्रत्यारोप, स्थानिक मुद्दे आणि पक्षीय ताकदीमुळे ही लढत कोणत्याही एका बाजूला झुकलेली नसल्याचे स्पष्ट होत आहे. विशेषतः जातीय समीकरणांचा प्रभाव निर्णायक ठरल्यास, तिन्ही उमेदवारांसाठी समान संधी निर्माण होऊ शकते. त्यामुळे हातखंबा–पाली गटातील निकाल शेवटच्या फेरीपर्यंत उत्कंठावर्धक ठरण्याची दाट शक्यता आहे.
सुयोग कांबळेंची कसोटी; शिंदे शिवसेनेची प्रतिष्ठा पणाला
शिंदेंच्या शिवसेनेकडून उमेदवारी मिळालेले सुयोग कांबळे यांच्यासाठी हातखंबा–पाली गटातील ही निवडणूक केवळ पहिलीच नव्हे, तर राजकीय भवितव्य ठरवणारी कसोटी ठरली आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी नव्या चेहऱ्यावर विश्वास दाखवत कांबळे यांना संधी दिल्याने, त्यांचा विजय हा थेट सत्ताधारी शिवसेनेच्या संघटनात्मक ताकदीचा आणि नेतृत्वाच्या निर्णयक्षमतेचा कौल मानला जाणार आहे. विशेषतः याच गटात पक्षातील माजी पदाधिकारी परशुराम कदम अपक्ष म्हणून मैदानात असल्याने, शिवसेनेच्या पारंपरिक मतदारांमध्ये मतविभाजन होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे कांबळे यांच्यासाठी ही लढत कठीण आणि आव्हानात्मक बनली आहे.

