(नाशिक)
स्वतःकडे दैवी शक्ती असल्याचा बनाव करून महिलांचे लैंगिक शोषण आणि भक्तांची फसवणूक करणाऱ्या स्वयंघोषित अशोक खरात प्रकरणात एसआयटीने मोठी कारवाई केली आहे. सायबर टीमने पीडितांशी संबंधित सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आलेल्या तब्बल १३ हजार १७५ आक्षेपार्ह व्हिडिओ लिंक्स इंटरनेटवरून हटवल्या असून, वारंवार अशा पोस्ट प्रसारित करणारी ४५१ सोशल मीडिया खाती कायमस्वरूपी बंद करण्यात आली आहेत.
एसआयटीच्या तपासातून अशोक खरातच्या गुन्ह्यांची धक्कादायक कार्यपद्धती समोर आली आहे. तपासानुसार, श्रद्धेचा गैरफायदा घेत तो भक्तांना मृत्यूची भीती दाखवत असे. खडे, चिंचुके, रुद्राक्ष आणि बनावट पूजाविधींच्या माध्यमातून तो लोकांकडून मोठ्या प्रमाणावर पैसे उकळत होता. तसेच मंदिर परिसरातील अंधाराचा फायदा घेत बनावट नाग दाखवून चमत्कार घडत असल्याचा आभास निर्माण केला जात होता. महिलांना दैवी शक्तीचा धाक दाखवून तसेच बदनामीची धमकी देत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचेही तपासात स्पष्ट झाले आहे. या प्रकरणामुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली आहे.
१७ गुन्हे दाखल; १०५ हून अधिक साक्षीदारांची चौकशी
अशोक खरातविरोधात नाशिक आणि नगर जिल्ह्यात एकूण १७ गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये महिला अत्याचाराचे आठ आणि फसवणुकीच्या एका गुन्ह्याचा तपास विशेष तपास पथकाकडून सुरू आहे. उर्वरित प्रकरणांचा तपास स्थानिक पोलीस करत आहेत.
एसआयटीकडे सध्या ११ गुन्ह्यांचा तपास सुरू असून, १०५ हून अधिक व्यक्तींची चौकशी आणि साक्ष नोंदवण्यात आली आहे. तपासादरम्यान मौखिक, दस्तऐवजी, भौतिक आणि इलेक्ट्रॉनिक स्वरूपातील महत्त्वाचे पुरावे जप्त करण्यात आले आहेत.
दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांमध्ये ६० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करणे बंधनकारक असल्याने एसआयटीने आतापर्यंत दोन प्रकरणांत न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले आहे. उर्वरित प्रकरणांतील प्रक्रिया अंतिम टप्प्यात असल्याची माहिती तपास यंत्रणेकडून देण्यात आली.
दरम्यान, अशोक खरात तब्बल ४९ दिवस एसआयटीच्या कोठडीत होता. सध्या तो सिन्नर पोलिसांच्या ताब्यात असून या संपूर्ण कारवाईसाठी २४ पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे विशेष पथक अहोरात्र कार्यरत आहे. एसआयटीने अशोक खरातच्या जाळ्यात अडकलेल्या आणखी पीडितांनी पुढे येऊन तक्रार नोंदवण्याचे आवाहन केले आहे.

