(देवरुख / सुरेश सप्रे)
दारू पिण्यावरून झालेल्या वादातून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून देवरुख पोलिसांनी जलद तपास करत आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणातील आरोपी आशिष शांताराम भावके (वय २७, रा. घोगाव, ता. कराड, जि. सातारा) आणि मयत सुधीर अर्जुन यादव (वय ३०, रा. साईकडे, ता. पाटण, जि. सातारा) हे एकमेकांचे मित्र तसेच नातेवाईक होते. दोघेही रत्नागिरी येथे फिरण्यासाठी आरोपीच्या एर्टिगा (एमएच ५० एन ४६४२) गाडीने आले होते.
३१ मार्च २०२६ रोजी रात्री सुमारे ११.३० वाजता आरेवारे परिसरात दारू पिल्यानंतर घरी परतत असताना, मयताने पुन्हा दारू पिण्याची मागणी केली. यावरून दोघांमध्ये वाद झाला. संतापाच्या भरात मयताने गाडीच्या बॉनेटवर चढून वाहनाचे नुकसान केले.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या आरोपीने मयत बॉनेटवर असतानाच गाडी सुरू केली. त्यामुळे तो खाली पडून गंभीर जखमी झाला. त्याच्या पाय, बरगड्या, कंबर व पोटावर गंभीर दुखापती झाल्या. तरीही आरोपीने त्याला घटनास्थळीच सोडून पळ काढला.
दुसऱ्या दिवशी त्याने जखमीला प्राथमिक आरोग्य केंद्र, साखरपा येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात रजि. नंबर ४५/ २०२६ चे भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम १०३ अंतर्गत दिनांक ४ एप्रिल २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक प्रमोद वाघाटे यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी तपास करून आरोपीला अटक केली असून न्यायालयाने त्याला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदय झावरे व त्यांच्या पथकाकडून सुरू आहे.

