(राजापूर / तुषार पाचलकर)
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ अंतर्गत राजापूर तालुक्याच्या पूर्व भागात पाचल येथे मतदानाचा वेग अपेक्षेपेक्षा मंद राहिला आहे. पाचल परिसरात दुपारी २ वाजेपर्यंत सुमारे ४० टक्के मतदानाची नोंद झाली आहे.
सकाळपासूनच काही मतदान केंद्रांवर मतदारांची उपस्थिती कमी दिसून आली. त्याचबरोबर अनेक ठिकाणी ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याच्या तक्रारी समोर आल्या. मशीन बंद राहिल्यामुळे मतदान प्रक्रियेत अडथळे निर्माण झाले. त्यामुळे मशीन बंद असलेल्या कालावधीइतका वेळ मतदानासाठी वाढवून द्यावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी पोलीस प्रशासनाने सर्व मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांकडून सतत लक्ष ठेवले जात आहे.
दरम्यान, मतदान केंद्रांवर वयस्कर आणि जेष्ठ नागरिकांना मदतीचा हात देण्यात येत असून, स्वयंसेवक आणि कर्मचारी त्यांना मतदान प्रक्रियेत सहकार्य करत आहेत. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढेल, अशी अपेक्षा प्रशासनाकडून व्यक्त करण्यात येत आहे.

