( चिपळूण )
चिपळूण तालुक्यातील शिरगाव, कुंभार्ली आणि पोफळी या तीन गावांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री सुखाई वरदायिनी महाकाली या जागृत देवस्थानचा वार्षिक भव्य यात्रोत्सव बुधवार, दिनांक १८ फेब्रुवारी २०२६ रोजी कुंभार्ली येथे मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे. धार्मिक कार्यक्रमांसोबतच सामाजिक उपक्रमांचा समावेश असलेला हा यात्रोत्सव परिसरातील भाविकांसाठी पर्वणी ठरणार आहे.
या यात्रोत्सवानिमित्त रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तसेच कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. शिरगाव, कुंभार्ली आणि पोफळी ही तीनही गावे एका कुटुंबाप्रमाणे नांदत असून, देवीच्या यात्रेच्या निमित्ताने स्थानिक नागरिकांसह चाकरमान्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती असते. यानिमित्त मंदिर परिसर विद्युत रोषणाई आणि फुलांच्या आकर्षक सजावटीने सजवण्यात येणार आहे.
यात्रोत्सव कार्यक्रमाचे वेळापत्रक
सकाळी ७ ते ९: देवीला अभिषेक व रूपी लावणे
सकाळी ९ ते १०: पूजा व आरती
सकाळी १० ते ११: लाट चढवणे
सकाळी १२ ते २: अन्नप्रसाद
सकाळी ११ ते २: रक्तदान शिबिर, नेत्र तपासणी व मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया
(श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल शिरगाव, समर्थ रक्तपेढी डेरवण व महाकाली देवस्थान यांच्या संयुक्त विद्यमाने)
दुपारी ३ ते ४: मांड भरणे व लाट प्रदक्षिणा
सायंकाळी ४: पारंपरिक ढोल-वादन
सायंकाळी ५ ते ७: हरिपाठ
सायंकाळी ६: कबड्डी अंतिम सामना व बक्षीस समारंभ
सायंकाळी ७ ते रात्री ८: मयूर उबाळे प्रस्तुत जय जगदंबा संबळ पथक
रात्री १० नंतर: वसंतराव वाडेकर यांचा लोकनाट्य तमाशा
भाविकांच्या सोयीसाठी चिपळूण एसटी डेपोतून विशेष यात्रा बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. महाकाली देवीच्या या वार्षिक यात्रोत्सवाला भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन देवस्थानतर्फे करण्यात आले आहे.

