(चिपळूण)
मुंबई–गोवा महामार्गावर असुर्डे येथे आज (गुरूवारी) सकाळी सुमारे ९.३० वाजता भीषण अपघात घडला. मुंबईहून रत्नागिरीच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव इर्टीगा कारने प्रथम दुचाकी व होंडा एलिव्हेट कारला धडक दिली. त्यानंतर नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या कडेला असलेल्या चार पादचाऱ्यांनाही जोरदार धडक बसली. या अपघातात एका पादचाऱ्याचा मृत्यू, तर तीन पादचारी गंभीर जखमी झाले.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पादचाऱ्याचे नाव विजय बाबाराम सावर्डेकर (वय ५४, रा. असुर्डे–रोहिदासवाडी) असे आहे. अंजली पवार, सुभाष जाधव आणि सतीश हुमणे अशी जखमी पादचाऱ्यांची नावे असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, गिरीश चंद्रकांत गावडे (वय ४१, रा. मुंबई) हे इर्टीगा कार चालवत होते. असुर्डे परिसरात आल्यानंतर कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. परिणामी दुचाकी व होंडा एलिव्हेट कारला धडक बसून पादचाऱ्यांवरही कार घुसली. अपघाताची तीव्रता इतकी होती की घटनास्थळीच विजय सावर्डेकर यांचा मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक ग्रामस्थांनी तातडीने मदतकार्य करत सावर्डे पोलिसांना कळवले. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. जखमींना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतदेह कामथे उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. या प्रकरणाची नोंद सावर्डे पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
विजय सावर्डेकर यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले आणि भावंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने असुर्डे–रोहिदासवाडी परिसरात शोककळा पसरली आहे.

