( मुंबई )
मुंबई आणि उपनगरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडत आहेत. अशातच चेंबूरमधील ११ नंबर रोड परिसरात मंगळवारी एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. धावत्या शाळेच्या बसवर अचानक मोठे झाड कोसळल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाला, तर १० विद्यार्थी जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे.
प्राथमिक माहितीनुसार, ही बस टिळकनगर येथील युनिव्हर्सल स्कूलची असून विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक रस्त्यालगतचे मोठे झाड बसवर कोसळले. या जोरदार धडकेत बसच्या वरच्या भागाचे मोठे नुकसान झाले आणि बसमध्ये एकच गोंधळ उडाला.
अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत बसमधील विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यास सुरुवात केली. १० जखमी विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले. मात्र, एक विद्यार्थी बसमध्ये अडकून पडल्याने त्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. अखेर त्याला बाहेर काढण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
अग्निशमन दल, पालिका आणि पोलीस घटनास्थळी
घटनेची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि स्थानिक पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले. बसवर कोसळलेले झाड मोठे आणि वजनदार असल्याने ते हटविण्यासाठी जेसीबीची मदत घेण्यात आली. अग्निशमन दलाने विशेष कटरच्या साहाय्याने झाडाच्या फांद्या कापून बचावकार्य पूर्ण केले.
जखमी विद्यार्थ्यांवर उपचार सुरू
जखमी सर्व विद्यार्थ्यांना तातडीने रुग्णवाहिकांमधून जवळच्या पालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर डॉक्टरांच्या विशेष पथकाकडून उपचार सुरू आहेत. या दुर्घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण असून पोलीस आणि पालिका प्रशासन संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत अनेक ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना समोर येत असून नागरिकांनी आवश्यक असल्याशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

