( पिंपरी-चिंचवड / पुणे )
पिंपरी-चिंचवड शहरातील मोरवाडी परिसरात एकाच कुटुंबातील आई, वडील आणि 19 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये ही घटना घडली. आर्थिक अडचणींमुळे कुटुंबाने टोकाचे पाऊल उचलल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असला, तरी या घटनेमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मृतांमध्ये विनोद पिल्लई (50), त्यांच्या पत्नी सिरजा पिल्लई (45) आणि मुलगी पौर्णिमा पिल्लई (19) यांचा समावेश आहे. विनोद पिल्लई यांचा 1 ऑगस्ट रोजी मृत्यू झाला, तर पत्नी सिरजा आणि मुलगी पौर्णिमा यांचा 2 ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला.
मोरवाडीतील सोसायटीत धक्कादायक घटना
मोरवाडी येथील करिष्मा ग्लोरी सोसायटीमध्ये शनिवारी विनोद पिल्लई यांचा मृतदेह आढळला. त्यावेळी त्यांची पत्नी आणि मुलगी गंभीर अवस्थेत आढळून आल्या. त्यांना तातडीने वायसीएम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोघींचाही मृत्यू झाला. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला असून, कुटुंबाने विषारी पदार्थाच्या संपर्कात आल्याचा प्राथमिक संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यांनी सोडियम नायट्रेट सारख्या एखाद्या विषारी औषधाचा धूर घेऊन जीवन संपवल्याचा पोलिसांना संशय आहे. नेमके कारण आणि मृत्यूची परिस्थिती तपासानंतर स्पष्ट होणार आहे.
सुसाईड नोटमुळे तपासाला वेगळे वळण
या घटनेनंतर पोलिसांना एक कथित सुसाईड नोट मिळाल्याची माहिती आहे. त्यामध्ये मृत्यूसाठी कोणालाही जबाबदार धरू नये, असा मजकूर असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, या नोटच्या आधारे घटनेचे कारण निश्चित झालेले नाही. पोलिसांकडून नोटची सत्यता, त्यातील मजकूर आणि कुटुंबाच्या आर्थिक तसेच वैयक्तिक परिस्थितीचा तपास केला जात आहे.
उच्चशिक्षित कुटुंबावर काळाचा घाला
पिल्लई कुटुंबातील तिघेही उच्चशिक्षित होते. सिरजा पिल्लई या शहरातील एका शाळेत कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत असल्याचे सांगण्यात येते. मुलगी पौर्णिमा पिल्ले ही पिंपरी चिंचवड शहरातील एका नामांकित महाविद्यालयात कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेत होती. विनोद पिल्लई हे पूर्वी एका नामांकित कंपनीत कार्यरत होते. 2024 पर्यंत त्यांनी नोकरी केली होती आणि त्यानंतर ते घरून काम करत असल्याचे मित्रांनी सांगितल्याची माहिती समोर आली आहे.
आर्थिक अडचणींचा तपास
पिल्लई कुटुंबाने आर्थिक विवंचनेतून हे टोकाचे पाऊल उचलले असावे, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, कुटुंबावर नेमका कोणत्या प्रकारचा आर्थिक ताण होता, त्यामागे इतर काही कारण होते का, याचा तपास संत तुकाराम नगर पोलिसांकडून सुरू आहे. उच्चशिक्षित आणि स्थिर पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबाने असे टोकाचे पाऊल का उचलले, हा प्रश्न या घटनेनंतर उपस्थित झाला आहे. पोलिस तपासातून या घटनेमागचे नेमके कारण समोर येण्याची शक्यता आहे.

