(रत्नागिरी)
रत्नागिरीतील टेनिस क्रिकेट क्षेत्रातील परिचित नाव आणि युवा स्पोर्ट्सचे मालक प्रविण पवार यांचे आज दुःखद निधन झाले. चिंचखरी येथे सुरू असलेल्या क्रिकेट स्पर्धेदरम्यान खेळत असताना त्यांना अचानक हृदयविकाराचा झटका आला.
सामन्यादरम्यान अचानक प्रकृती बिघडल्याने प्रविण पवार मैदानावरच कोसळले. उपस्थितांनी तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचार सुरू होण्यापूर्वीच डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रविण पवार यांच्या अकाली निधनाने रत्नागिरीतील टेनिस क्रिकेट विश्वावर शोककळा पसरली आहे. खेळाडू, संघटक आणि क्रीडाप्रेमींमध्ये ते अत्यंत लोकप्रिय होते. क्रिकेटच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे.
त्यांच्या जाण्याने स्थानिक क्रिकेट क्षेत्राची मोठी हानी झाली असून सर्व स्तरांतून शोकसंवेदना व्यक्त केल्या जात आहेत. अनेक क्रीडा संघटना, खेळाडू आणि चाहत्यांनी सामाजिक माध्यमांवरून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.
दिवंगत प्रविण पवार यांच्या आत्म्यास शांती लाभो, अशी प्रार्थना संपूर्ण क्रीडाप्रेमी वर्गाकडून करण्यात येत आहे.

