(तरवळ / अमित जाधव)
रत्नागिरी तालुक्यातील निवळी-जयगड महामार्गावरील तरवळ येथे खेडेकर यांच्या घरासमोरील रस्त्यावर मोठे आणि धोकादायक खड्डे पडल्याने वाहतुकीचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्यांमुळे कोणत्याही क्षणी मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत असून, तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून होत आहे.
गेल्या काही दिवसांतील मुसळधार पावसामुळे निवळी-जयगड महामार्गावरील अनेक ठिकाणी रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. विशेषतः तरवळ येथील हा भाग दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांनी व्यापला जातो. या मार्गावरून दररोज शेकडो अवजड वाहने, एसटी बस आणि इतर वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे वाहनचालकांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत असून, स्थानिक रहिवाशांनाही सतत भीतीच्या छायेखाली राहावे लागत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, दरवर्षी पावसाळ्यात याच ठिकाणी मोठे खड्डे पडतात. प्रशासनाकडून केवळ तात्पुरती डागडुजी केली जाते; मात्र ती काही दिवसांतच पुन्हा उखडते. परिणामी, प्रत्येक वर्षी हीच समस्या पुन्हा निर्माण होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी हे खड्डे सहज लक्षात न आल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे अपघाताची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने सुरक्षिततेच्या उपाययोजना कराव्यात, अशी मागणी होत आहे.
या ठिकाणी वारंवार डागडुजी करण्याऐवजी काँक्रीटचा कायमस्वरूपी मजबूत रस्ता उभारावा, जेणेकरून दरवर्षी निर्माण होणाऱ्या या समस्येवर कायमचा तोडगा निघेल, अशी मागणी वाहनचालक, प्रवासी, स्थानिक नागरिक आणि ग्रामस्थांनी केली आहे. तसेच “मोठा अपघात झाल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.

