(मुंबई)
मुंबईतील कफ परेड परिसरातून माणुसकीला काळिमा फासणारी एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. 20 वर्षांच्या मूकबधिर आणि दिव्यांग तरुणीवर तिच्याच जन्मदात्या वडिलांनी वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचा घृणास्पद प्रकार पोलिस तपासात उघड झाला आहे. डीएनए चाचणीत थेट वडिलांचाच डीएनए गर्भाशी जुळल्याने संपूर्ण यंत्रणेला धक्का बसला आहे.
पोटदुखीच्या तक्रारीतून उघड झाला गुन्हा
सप्टेंबर 2025 मध्ये पीडित तरुणीने आपल्या आजीकडे पोटात वेदना आणि हालचाल जाणवत असल्याची माहिती दिली होती. हाताच्या खुणांद्वारे संवाद साधत तिने पोटात काहीतरी वळवळत असल्याचं सांगितलं. यानंतर तिला तातडीने मुंबईतील कामा अँड अल्ब्लेस रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय तपासणीत ती तरुणी तब्बल पाच महिन्यांची गर्भवती असल्याचं निष्पन्न झालं. हा प्रकार लक्षात येताच रुग्णालय प्रशासनाने तातडीने कफ परेड पोलिसांना माहिती दिली.
पोलिस तपासातील अडचणी
पीडिता मूकबधिर असल्याने आणि सुरुवातीला तक्रार देण्यास तयार नसल्यामुळे तपासात मोठ्या अडचणी निर्माण झाल्या. पोलिसांनी सुरुवातीला तिच्या वडिलांची चौकशी केली, मात्र त्यांनी सर्व आरोप फेटाळले आणि मुलगी गरोदर कशी राहिली याबाबत आपल्याला माहिती नसून याबाबत कोणताही खुलासा किंवा माहिती दिली नाही. तसेच कुठल्याही प्रश्नाचे योग्य उत्तर दिले नाही.
कौन्सिलिंगनंतर समोर आलं धक्कादायक सत्य
बाल हक्क आणि दिव्यांग सहकार्य संस्थेच्या मदतीने पीडितेचे समुपदेशन करण्यात आले. त्यानंतर ती तक्रार देण्यासाठी तयार झाली. मिळालेल्या माहितीनुसार ही घटना मागच्या वर्षी सप्टेंबरमध्ये सुरू झाली होती. पोलिसांनी सुरुवातीला एक दोन लोकांना अटक केली. तिने दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आधी एका 32 वर्षीय पुरुषाला ताब्यात घेण्यात आले आणि एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलालाही ताब्यात घेण्यात आले. मात्र, संशय अधिक गडद झाल्यानंतर पोलिसांनी शास्त्रीय पुराव्यांचा आधार घेतला. पीडितेच्या संपर्कात आलेल्या नातेवाईकांसह एकूण 17 संशयितांचे डीएनए आणि रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले.
डीएनए अहवालाने उघड केला बापाचा गुन्हा
पीडितेचा गर्भपात करून भ्रूणाचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले. 27 जानेवारी 2026 रोजी प्राप्त झालेल्या डीएनए अहवालात केवळ एका व्यक्तीचा डीएनए जुळला आणि तो म्हणजे पीडित तरुणीचे स्वतःचे वडील. पोलिस तपासानुसार, मार्च 2025 ते 21 सप्टेंबर 2025 या कालावधीत हा लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. याप्रकरणी 48 वर्षीय वडिलांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
भीतीमुळे उशिरा उघड झाला प्रकार
पोलिसांनी सांगितले की, वडिलांच्या भीतीखाली असल्यामुळे पीडितेने सुरुवातीला त्यांचे नाव घेतले नव्हते. समुपदेशनादरम्यान तिने कबुली दिली की, घरात एकटी असताना वडिलांकडून तिच्यावर वारंवार अत्याचार करण्यात आले.
पीडितेच्या परिस्थितीचा फायदा इतर कुणी घेतला आहे का, याचाही तपास सुरू असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. या घटनेमुळे मुंबईसह संपूर्ण राज्यात संताप व्यक्त केला जात असून, आरोपीला कठोरात कठोर शिक्षा देण्याची मागणी होत आहे.

