(मुंबई / वृत्तसंस्था)
अभिनेता टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार करून पसार झालेल्या तीन आरोपींना मुंबई पोलिसांनी राजस्थानमधून अटक केली आहे. दिल्ली, गुजरात आणि राजस्थान पोलिसांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी सज्ञान असून, त्यापैकी एकाचे वय १८ वर्षे, तर अन्य दोघांचे वय २२ वर्षे आहे. गोळीबारानंतर आरोपींनी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ दुचाकी सोडली आणि रस्तेमार्गे सुरत गाठले. तेथून पुणे-जयपूर एक्स्प्रेसने राजस्थानच्या दिशेने प्रवास केला. कोटा पोलिसांनी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपींना पकडले, अशी माहिती डीसीपी राजतिलक रौशन यांनी पत्रकार परिषदेत दिली.
टायगर श्रॉफवर मुंबईतील जुहू परिसरात झालेल्या गोळीबारात त्यांचा कारचालक आणि अन्य एक व्यक्ती असे दोघे जखमी झाले होते. या घटनेनंतर मुंबई गुन्हे शाखेने तपासासाठी जवळपास २० पथके तयार केली. तांत्रिक विश्लेषण आणि प्रत्यक्ष तपासाच्या आधारे पोलिसांनी हल्ल्यात वापरण्यात आलेली दुचाकी शोधून काढली. ही दुचाकी अंधेरी रेल्वे स्थानकाजवळ आढळली. त्यानंतर परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता आरोपी पश्चिम रेल्वेच्या मार्गाने उत्तरेकडे गेल्याचे निष्पन्न झाले.
डीसीपी राजतिलक रौशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी गोळीबाराच्या घटनेच्या सुमारे १० ते १५ मिनिटे आधी घटनास्थळी आले होते. दुचाकीवर तिघे जण होते. त्यापैकी एक दुचाकी चालवत होता, तर अन्य दोघांनी गोळीबार केला. हल्ल्यानंतर तिघेही घटनास्थळावरून पसार झाले. या हल्ल्यात एकूण पाच गोळ्या झाडण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
आरोपी सुरतला गेल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या पुढील प्रवासाचा माग काढला. सुरत रेल्वे स्थानकावरून त्यांनी पुणे-जयपूर एक्स्प्रेस पकडल्याचे तपासात समोर आले. आरोपी रेल्वेच्या नेमक्या कोणत्या डब्यात प्रवास करत आहेत, याची माहिती मुंबई पोलिसांनी मिळवली आणि ती कोटा पोलिसांना दिली. त्यानुसार कोटा पोलिसांनी कारवाई करून तिघांना अटक केली. त्यानंतर मुंबई पोलिसांचे पथक काही तासांनी तेथे पोहोचले, असे रौशन यांनी स्पष्ट केले.
अटक केलेल्या तिघांपैकी दोघे हरियाणातील सोनीपत येथील रहिवासी असून, तिसरा आरोपी बिहारचा आहे. दोघे एकाच जिल्ह्यातील असल्याने त्यांची एकमेकांशी ओळख होती. तिसरा आरोपी या कटात कसा सहभागी झाला, याची चौकशी पुढील तपासात केली जाणार आहे. आरोपींना मुंबईत आणून न्यायालयात हजर केले जाणार असून, त्यांची रिमांड घेण्याची प्रक्रिया केली जाईल.
गोळीबारासाठी वापरलेले हत्यार कुठे टाकण्यात आले आणि ते आरोपींना कोणी पुरवले, याचाही तपास केला जाणार आहे. या कटामागील सूत्रधारांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणाचा तपास खंडणीविरोधी पथकाकडे सोपवण्यात आला असून, सोशल मीडियावर करण्यात आलेल्या पोस्टचीही चौकशी सुरू आहे. टायगर श्रॉफ किंवा त्यांच्या कुटुंबीयांना धमकी मिळाल्याची कोणतीही तक्रार पोलिसांकडे आलेली नसल्याचे डीसीपी रौशन यांनी सांगितले.


