(चिपळूण / वार्ताहर)
चिपळूण तालुक्यातील रावळगाव येथे अमिषा अरविंद सुर्वे (वय २३, रा. रावळगाव सर्वेवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) या तरुणीने राहत्या घराच्या पडवीत गळफास घेतला. ही घटना २० ऑक्टोबर २०२६ रोजी घडली. या प्रकरणी चिपळूण पोलिसांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या (BNSS) कलम १९४ अन्वये अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, २० ऑक्टोबर रोजी दुपारी ४ वाजण्यापूर्वी अमिषा सुर्वे हिने रावळगाव सर्वेवाडी येथील राहत्या घराच्या पडवीत अज्ञात कारणावरून गळफास घेतला. ही बाब कुटुंबीयांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी तातडीने धाव घेतली. मात्र, तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता.
घटनेनंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी कामथे येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. या रुग्णालयाकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चिपळूण पोलिसांनी २० ऑक्टोबर २०२६ रोजी रात्री सव्वादहाच्या सुमारास अकस्मात मृत्यूची नोंद केली. या प्रकरणाची नोंद रजिस्टर क्रमांक ६२/२०२६ अशी करण्यात आली आहे.
अमिषा सुर्वे हिच्या मृत्यूमागील कारण अद्याप समोर आलेले नाही. या घटनेप्रकरणी चिपळूण पोलीस पुढील तपास करत आहेत.


