(राजापूर/ तुषार पाचलकर)
आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पाचल बाजारपेठेतील पाचल बस स्थानक व छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे सरस्वती विद्या मंदिर, पाचल या प्रशालेच्या विद्यार्थ्यांनी पथनाट्य सादर करून मतदारांमध्ये मतदानाबाबत जनजागृती केली.
या पथनाट्याच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी भारतीय संविधानाने लोकशाही व्यवस्थेत १८ वर्षे पूर्ण केलेल्या प्रत्येक नागरिकाला मतदानाचा अधिकार दिला असल्याचे प्रभावीपणे मांडले. योग्य उमेदवाराची निवड करणे हा प्रत्येक मतदाराचा अधिकार आणि जबाबदारी असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. तसेच सर्व निवडणुका निवडणूक आयोगाच्या माध्यमातून पारदर्शकपणे घेतल्या जातात, हा संदेशही त्यांनी दिला.
येत्या ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये प्रत्येक मतदाराने आवर्जून मतदान करून आपला संवैधानिक हक्क बजावावा, असे आवाहन या पथनाट्यातून करण्यात आले. उपस्थित नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक केले.
या उपक्रमाला संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती गुरखे मॅडम यांची मान्यता लाभली. प्रशालेचे कला शिक्षक श्री. सिद्धार्थ जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले, तर सहाय्यक शिक्षक श्री. रविंद्र लाड यांनी मोलाचे सहकार्य केले. यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष अशोक गंगाराम सक्रे आणि शिक्षक-पालक संघाचे अध्यक्ष विनायक सक्रे उपस्थित होते.

