(चिपळूण)
बॉम्बे इंजिनिअर ग्रुपच्या 270 इंजिनिअर रेजिमेंट सदाविजय यांच्या पुढाकारातून माजी सैनिक व वीरनारींसाठी जनजागृती आणि थेट संवाद साधण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेली भव्य बाईक रॅली पुण्याहून निघून बुधवारी चिपळूणमध्ये दाखल झाली. संपूर्ण महाराष्ट्रभर फिरणाऱ्या या रॅलीने माजी सैनिक समुदायात उत्साहाचे वातावरण निर्माण केले आहे.
या बाईक रॅलीचा मुख्य उद्देश रेजिमेंटमधील रिटायर्ड सैनिक व वीरनारींना भेडसावणाऱ्या अडचणी समजून घेणे, त्यांचे प्रश्न ऐकून मार्गदर्शन करणे आणि सदाविजय परिवाराला एका छताखाली एकत्र आणणे हा आहे. यासोबतच शाळा व महाविद्यालयांमध्ये भेट देऊन नवतरुणांना देशसेवेसाठी प्रेरित करणे हा देखील या उपक्रमाचा महत्त्वाचा भाग आहे.
चिपळूणमध्ये रॅलीच्या स्वागतासाठी माजी सैनिक रत्नागिरी तसेच माजी सैनिक चिपळूण संघटनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी 270 इंजिनिअर रेजिमेंटचे अनेक माजी सैनिक आणि वीरनारींनी सहभाग घेतला. सर्व जांबाज सैनिकांचा मिलिटरी बॉईज हॉस्टेल, चिपळूण येथे सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान उपस्थितांनी या उपक्रमाचे कौतुक करत, माजी सैनिकांच्या समस्या सोडवण्यासाठी अशा प्रकारचे संवादात्मक आणि व्यापक प्रयत्न भविष्यातही सुरू राहावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली.
विशेष म्हणजे 270 इंजिनिअर रेजिमेंटचे कमांडिंग ऑफिसर कर्नल रॉबिन अॅटोणी यांच्या नेतृत्वाखाली प्रथमच असा स्तुत्य आणि अभिनव उपक्रम राबवण्यात आला आहे. सदाविजय परिवारासाठी हा उपक्रम ऐतिहासिक ठरला असून, अशा स्वरूपाची बाईक रॅली प्रथमच झाल्याने ती माजी सैनिकांमध्ये चर्चेचा विषय ठरत आहे.

