( रत्नागिरी /प्रतिनिधी )
समाजातील प्रश्नांवर सातत्याने काम करत सामाजिक बांधिलकी जपणारी भाकर सेवा संस्था गेली ३२ वर्षे शेती, आरोग्य, शिक्षण, पर्यावरण आणि महिला सबलीकरण या क्षेत्रात कार्यरत आहे. विविध प्रकल्पांद्वारे समाजाच्या उन्नतीसाठी योगदान देतानाच, नैसर्गिक आपत्तीच्या काळात तातडीने मदतीचा हात देण्याची परंपरा संस्थेने कायम राखली आहे. गुजरात भूकंप (२००१), सोलापूर दुष्काळ (२००४), चिपळूण पूर (२०२१), तसेच कोविड-१९ महामारीच्या काळात (२०२०-२१) संस्थेने उल्लेखनीय कार्य केले आहे.
गेल्या चार दशकांतील सर्वात भीषण पुरामुळे पंजाबमधील तब्बल २२ जिल्ह्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. घरे, शाळा, शेती आणि उपजीविका उध्वस्त झाल्याने हजारो कुटुंबे हतबल झाली आहेत. अशा गंभीर परिस्थितीत कोकणातून भाकर सेवा संस्थेचे पहिले मदत पथक रविवारी रवाना झाले. या पथकामध्ये संस्थापक श्री. देवेंद्र पाटील, श्री. पारस पोवार, श्री. श्रेयश घाटगे, श्री. प्रतिक घाटगे आणि श्री. श्रीधर पाटील यांचा सहभाग आहे. गेले काही दिवस संस्थेचे कार्यकर्ते, संचालक मंडळ आणि समाजातील दानशूर व्यक्तींमार्फत मोठ्या प्रमाणावर मदत गोळा करून पंजाबकडे पाठविण्यात आली आहे.
रत्नागिरीहून रवाना झालेले हे पहिले पथक पूरग्रस्त भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यकतेनुसार पुढील मदतकार्य सुरु करेल. लवकरच दुसरे पथक देखील रवाना करण्याची तयारी संस्था करत आहे. या पार्श्वभूमीवर भाकर परिवाराने समाजाला आवाहन केले आहे की, सामाजिक बांधिलकी म्हणून आपला मदतीचा हात पुढे करावा. अधिक माहितीसाठी संस्थेचे संचालक श्री. पवनकुमार मोरे (संपर्क : ८६६९८५८३२४) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

