(मुंबई)
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) सर्वसामान्य नागरिकांच्या श्रद्धेला सुरक्षितता आणि परवडणाऱ्या खर्चाची जोड देणारी ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन’ योजना सुरू केली आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार ही योजना राबविण्यात येत असून, परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबत माहिती दिली.
ही योजना श्रद्धा, सुविधा आणि सामाजिक न्याय यांचा संगम असल्याचे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. ‘स्वस्त आणि सुरक्षित’ या ब्रीदवाक्यावर आधारित या योजनेचा मुख्य उद्देश सर्वसामान्य प्रवाशांना परवडणाऱ्या दरात धार्मिक पर्यटनाचा अनुभव देणे हा आहे. राज्य शासनाने एसटी प्रवासासाठी ज्या सामाजिक सवलती जाहीर केल्या आहेत, त्या सर्व सवलती या योजनेत लागू राहणार आहेत. महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना मूळ तिकिटावर 50 टक्के सवलत, तर 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा दिली जाणार आहे.
या योजनेअंतर्गत प्रत्येक आगाराच्या कार्यक्षेत्रातून 40 प्रवाशांचा गट तयार करून सहली आयोजित करण्यात येणार आहेत. सामाजिक सवलतीच्या दरात तिकीट उपलब्ध करून देण्यात येणार असून, प्रवासासाठी एसटीच्या नव्या, सुरक्षित आणि आरामदायी बसेस वापरण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर होणार आहे.
23 जानेवारी 2026 पासून ही योजना राज्यातील 251 आगारांमधून एकाच वेळी सुरू करण्यात येणार आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार प्रत्येक आगारातून किमान पाच बसेस उपलब्ध करून दिल्या जाणार असून, राज्यभरातून दररोज सुमारे 1,000 ते 1,250 धार्मिक व पर्यटन विशेष बसगाड्या धावणार आहेत. यामुळे राज्यातील धार्मिक पर्यटनाला मोठे प्रोत्साहन मिळणार आहे.
योजनेत समाविष्ट श्रद्धास्थळे
प्रवाशांच्या मागणीनुसार अष्टविनायक दर्शन, 11 मारुती दर्शन, पंढरपूर-अक्कलकोट, तुळजापूर, कोल्हापूर-पन्हाळा-जोतिबा, गणपतीपुळे, शेगाव, शिर्डी अशा प्रमुख श्रद्धास्थळांच्या सहली आयोजित केल्या जाणार आहेत. या माध्यमातून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि अध्यात्मिक वैभवाचा अनुभव घेण्याची संधी भाविकांना मिळणार आहे.
‘स्वस्त आणि सुरक्षित पर्यटन’ ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवणारी ही योजना म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या सर्वसामान्यांवरील प्रेमाची आणि विचारांचीच पुढची पायरी असल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सुरू होत असलेली ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे एसटी संगे तीर्थाटन’ योजना राज्यातील लाखो भाविकांसाठी श्रद्धा, सुरक्षितता आणि समाधानाचा प्रवास ठरेल, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

