(नवी दिल्ली)
रशियाने भारताला कच्च्या तेलाच्या खरेदीसाठी पुन्हा एकदा मोठी सवलत देण्याची ऑफर दिली आहे. जागतिक बाजारात सुरू असलेल्या दरांपेक्षा प्रति बॅरल १० डॉलरपेक्षा अधिक, तर काही बाजार विश्लेषकांच्या मते तब्बल ११ डॉलरपर्यंत सूट देण्याची तयारी रशियाने दर्शवली आहे. भारतातील कच्च्या तेलाचा पुरवठा सुरळीत राहावा, हाच या ऑफरमागचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे, गेल्या ऑक्टोबर महिन्यात भारताला मिळणाऱ्या सवलतीच्या तुलनेत ही सूट जवळपास तीन पट वाढवण्यात आली आहे. त्यामुळे भारतासाठी रशियन तेल आर्थिकदृष्ट्या अधिक फायदेशीर ठरण्याची शक्यता आहे.
अमेरिका-भारत ट्रेड डील आणि रशियाची चाल
अलीकडेच अमेरिका आणि भारत यांच्यात ट्रेड डील जाहीर झाली आहे. मात्र अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प वारंवार भारताने रशियाकडून तेल खरेदी करू नये, तर व्हेनेझुएलाकडून तेल आयात करावी, असा आग्रह धरत आहेत. यावर भारताने आपली भूमिका स्पष्ट केली असून, ज्या देशांवर आंतरराष्ट्रीय निर्बंध आहेत, त्यांच्याकडून तेल खरेदी केली जाणार नाही, असे भारताने ठामपणे सांगितले आहे.
दरम्यान, भारत रशियाकडून तेल खरेदी करतो या कारणावरून अमेरिकेने भारतावर २५ टक्के अतिरिक्त टॅरिफ लावला होता. मात्र ट्रेड डीलसोबतच हा टॅरिफ हटवण्यात आला आहे. या टॅरिफच्या काळात भारत आणि रशिया यांच्यातील संबंध अधिक दृढ झाल्याचे दिसून आले होते.
टॅरिफ हटताच रशियाची मोठी घोषणा
अमेरिकेने टॅरिफ हटवल्यानंतर अवघ्याच काही काळात रशियाने भारतासाठी ही मोठी सवलतीची घोषणा केल्याने आंतरराष्ट्रीय राजकारणात चर्चेला उधाण आले आहे. अमेरिका आणि रशिया यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर भारताला दिलेली ही ऑफर अमेरिकेला अप्रत्यक्ष शह देणारी मानली जात आहे.
भारतासमोर कठीण समीकरण
एकीकडे अमेरिकेसोबतची ट्रेड डील अंतिम झाली असताना, दुसरीकडे रशियाकडून मिळणारी आकर्षक सवलत भारतासाठी दुर्लक्षित करण्यासारखी नाही. भारत आणि रशिया हे जुने मित्रदेश असून, अलीकडच्या काळात रशियाने भारतीय बाजारपेठेसाठी अनेक संधी खुल्या केल्या आहेत. अशा परिस्थितीत भारत कोणता मार्ग निवडणार, अमेरिका आणि रशिया यांच्यातील तोल कसा साधणार आणि कच्च्या तेलाच्या खरेदीबाबत कोणता अंतिम निर्णय घेणार, याकडे देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

