(रत्नागिरी / निलेश रहाटे)
संविधान सन्मान सभा आणि श्री. प्रथमेश गोपाल गावणकर यांच्या वाटद-खंडाळा येथील जनसंपर्क कार्यालयाचे भव्य उद्घाटन रविवारी (३० नोव्हेंबर २०२५) उत्साहात संपन्न झाले.
कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते म्हणून संविधान विश्लेषक, तसेच उच्च व सर्वोच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील श्री. असीम सरोदे, अँड. श्रिया आवळे (वकील, उच्च न्यायालय मुंबई) आणि अँड. बाळकृष्ण निढाळकर (वकील, उच्च न्यायालय मुंबई) यांनी उपस्थित राहून “संविधानिक लोकशाही व लोककल्याणाचा मार्ग” या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. वक्त्यांनी संविधानाचे महत्त्व, सामाजिक न्याय, तसेच जनसंपर्काची भूमिका यावर भाष्य करत नागरिकजनजागृतीचे महत्व अधोरेखित केले.
नागरिकांना शासकीय कार्यालयांमध्ये येणाऱ्या अडचणी, मुदतीत काम न करणारे व अनियमित वागणूक देणारे अधिकारी, तसेच भ्रष्टाचाराविरोधात प्रभावी लढा देण्यासाठी या जनसंपर्क कार्यालयात वकीलांची मोफत मार्गदर्शन सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींना अधिक बळ मिळेल आणि टाळाटाळ करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निश्चितच वचक बसेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
उद्घाटन कार्यक्रमाला स्थानिक नागरिक, प्रतिष्ठित व्यक्ती, महिलावर्ग, तसेच युवा मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. प्रथमेश गावणकर यांच्या उपक्रमाचे मनापासून स्वागत करून त्यांच्या पुढील लोकहिताच्या कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. स्थानिकांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रम अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

