(जाकादेवी / वार्ताहर)
उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे ओरीतील निष्ठावान शिवसैनिक तसेच ओरी तंटामुक्त गाव समितीचे माजी अध्यक्ष रमाकांत देसाई यांचे बुधवार दिनांक २२ रोजी वयाच्या ६२ व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले.
हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचे ते निष्ठावान कार्यकर्ते होते. जाकादेवी येथे शिवसेनेची पहिली शाखा उघडण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता. धडाडीचे शिवसैनिक या नात्याने त्यांनी गावातील पायाभूत गरजा पूर्ण करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वाचे ठरले.शिवसेना पक्षाचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून ते ओळखले जात. आपला स्वार्थ साधण्यासाठी काही कार्यकर्ते पक्षांतर करतात. मात्र रमाकांत विष्णू देसाई हे आपल्या पक्षाशीच एकनिष्ठ राहिले. त्यांनी आपल्या जीवनकाळात कुठल्याही अन्य पक्षात प्रवेश केला नव्हता. कै. रमाकांत देसाई यांच्या कुटुंबियांनी सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवून याआधी सामुदायिक कामासाठी सढळहस्ते जमीनदान देलेली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, बहिणी, मेहुणे, दोन मुलगे असा परिवार आहे. त्यांच्या आकस्मित झालेल्या निधनाबद्दल ओरी गावासह परिसरातून तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून तीव्र दुःख व्यक्त होत आहे.