(मुंबई)
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी संध्याकाळी एक थरकाप उडवणारी घटना घडली. विमानतळावर जमिनीवर हालचाल सुरू असताना एअर इंडिया आणि इंडिगोच्या दोन प्रवासी विमानांचे पंख एकमेकांना घासले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही; मात्र देशाच्या आर्थिक राजधानीतील विमान सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ही घटना ३ फेब्रुवारी रोजी सायंकाळी सुमारे साडेसात वाजण्याच्या सुमारास घडली. मुंबईहून कोइम्बतूरकडे जाणारे एअर इंडियाचे AI2732 हे विमान उड्डाणापूर्वी C1 वरून M4 टॅक्सीवेच्या दिशेने जात होते. त्याच वेळी हैदराबादहून मुंबईत आलेले इंडिगोचे विमान 6E 791 लँडिंगनंतर टॅक्सी करत B1 बे मध्ये जाण्याच्या तयारीत होते. या दरम्यान दोन्ही एअरबस A320 प्रकारच्या विमानांच्या उजव्या पंखांच्या टोकांना एकमेकांचा स्पर्श झाला.
प्रवाशी असलेली विमाने, मोठा अनर्थ टळला
घटनेच्या वेळी दोन्ही विमाने प्रवाशांनी पूर्णपणे भरलेली होती. अपघातानंतर तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून दोन्ही विमाने पुन्हा बे मध्ये परत आणण्यात आली. सर्व प्रवाशांना सुरक्षितपणे खाली उतरवण्यात आले असून कोणालाही इजा झालेली नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.
एअर इंडियाचा खुलासा
एअर इंडियाने जारी केलेल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, “३ फेब्रुवारी रोजी मुंबईहून कोइम्बतूरला जाणारे AI2732 हे विमान उड्डाणापूर्वी टॅक्सीवेवर थांबले असताना दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाच्या संपर्कात आले. दोन्ही विमानांच्या पंखांच्या टोकांना टक्कर झाली असून आमच्या विमानाच्या पंखाच्या टोकाचे किरकोळ नुकसान झाले आहे. खबरदारी म्हणून विमान पुढील तांत्रिक तपासणीसाठी ग्राउंड करण्यात आले आहे. प्रवाशांची सुरक्षितपणे व्यवस्था करण्यात आली आहे.”
इंडिगोच्या प्रवक्त्याने सांगितले की, “हैदराबादहून मुंबईत आलेले फ्लाइट 6E 791 टॅक्सी करत असताना दुसऱ्या एअरलाइनच्या विमानाच्या पंखाच्या टोकाशी घासले गेले. सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.” इंडिगोनेही घटनेची माहिती संबंधित यंत्रणांना दिली आहे.
डीजीसीए चौकशी सुरू
या घटनेनंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाचे (DGCA) अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. डीजीसीएने दोन्ही विमान कंपन्यांना सविस्तर अहवाल सादर करण्याचे आदेश दिले असून, ही घटना मानवी चूक, समन्वयातील त्रुटी की तांत्रिक कारणामुळे घडली, याचा तपास सुरू आहे.
जमिनीवरील वाहतूक व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह
अलीकडील विमान अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने प्रवासी सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. विशेषतः विमानतळांवरील जमिनीवरील हालचाली, टॅक्सीवे व्यवस्थापन आणि समन्वय यांचे महत्त्व या घटनेमुळे अधोरेखित झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार दोन्ही विमानांचे किरकोळ नुकसान झाले असून विमानतळाच्या कामकाजावर काही काळ तात्पुरता परिणाम झाला.
प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य असल्याचे दोन्ही विमान कंपन्यांनी स्पष्ट केले असून, चौकशी अहवालानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.

