( चिपळूण )
चिपळूण शहरातील राष्ट्रीय महामार्गावर राधाकृष्ण नगर येथील मुत्तपन मंदिरच्या स्वागत कमानीजवळ सोमवारी रात्री सुमारे ९.१५ वाजता भीषण अपघात घडला. ट्रिपल सीटने प्रवास करणारी एक्टिवा दुचाकी चालकाचा ताबा सुटल्याने थेट खोल नाल्यात कोसळली. या अपघातात तिघे तरुण जखमी झाले असून त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे.
प्राप्त माहितीनुसार, हे तिघे तरुण बहादूरशेख नाका येथून डीबीजे महाविद्यालयाच्या दिशेने महामार्गाने प्रवास करत होते. राधाकृष्ण नगर परिसरात मुत्तपन मंदिरच्या कमानीजवळ आल्यानंतर अचानक दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि दुचाकीसह तिघेही खोल नाल्यात पडले.
या नाल्यातून नगर परिषदेची पोलादी पाईपलाईन गेली असून अपघातावेळी तिघेही तरुण त्या पाईपलाईनवर आदळले. यामुळे एका तरुणाच्या हाताला गंभीर दुखापत झाली असून तो घटनास्थळीच बेशुद्ध पडला होता. उर्वरित दोघांनाही किरकोळ ते मध्यम स्वरूपाच्या दुखापती झाल्या आहेत.
अपघातानंतर मदतीसाठी काही नागरिक तात्काळ नाल्यात उतरले. मात्र नाल्याच्या दोन्ही बाजूंना उंच भिंत असल्याने जखमींना बाहेर काढणे कठीण झाले. त्याच वेळी महामार्गावरून जाणारी क्रेन नागरिकांच्या निदर्शनास आली. क्रेन घटनास्थळी आणून तिच्या साह्याने तिघांनाही सुरक्षितपणे नाल्यातून बाहेर काढण्यात आले.
जखमी तरुणांना तातडीने नजीकच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हे तिन्ही तरुण चिपळूण शहरातील रहिवासी असून त्यापैकी दोघे खेंड विभागातील असल्याचे समजते.
या अपघातामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. संबंधित ठिकाणी सुरक्षिततेच्या उपाययोजना आणि संरक्षक भिंत उभारण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

