(चिपळूण)
चिपळूण नगरपरिषद निवडणुकीनंतर आता जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांसाठीही शिवसेना–भाजप युती निश्चित झाली आहे. युतीअंतर्गत जागावाटपावर एकमत झाले असून, चिपळूण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर दोन्ही पक्ष संयुक्तपणे निवडणूक लढवणार आहेत, अशी माहिती शिवसेना उपनेते तथा माजी आमदार सदानंद चव्हाण यांनी दिली.
चव्हाण यांनी सांगितले की, चिपळूण तालुक्यातील एकूण 9 जिल्हा परिषद गटांपैकी शिवसेना 6 जागांवर, तर भाजप 3 जागांवर निवडणूक लढवणार आहे. त्याचप्रमाणे 18 पंचायत समिती गणांपैकी शिवसेना 11 जागांवर आणि भाजप 7 जागांवर उमेदवार देणार आहे. नगरपरिषदेप्रमाणेच जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्येही शिवसेना–भाजप युतीला घवघवीत यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिवसेनेचे चिपळूण तालुका समन्वयक दिलीप चव्हाण उपस्थित होते. सदानंद चव्हाण पुढे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेली विकासकामे, लाडकी बहीण योजना तसेच विविध लोककल्याणकारी योजनांचा थेट लाभ जनतेपर्यंत पोहोचला आहे. युतीच्या या कामगिरीचा सकारात्मक परिणाम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये दिसून येईल, असा त्यांचा विश्वास आहे.
नुकत्याच झालेल्या राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये युतीला मिळालेल्या यशाचा फायदा आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले. तसेच काही दिवसांपूर्वी शिवसेनेतील माजी पदाधिकाऱ्यांना पुन्हा पक्षात सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले होते. या हाकेला मोठा प्रतिसाद मिळाल्याने युतीला निवडणुकीत अधिक बळ मिळेल, असे ते म्हणाले.
दरम्यान, माजी सभापती सौ. धनश्री शिंदे यांनी शिवसेनेकडून जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असून, त्या लवकरच उमेदवारी अर्ज दाखल करतील, अशी माहितीही सदानंद चव्हाण यांनी दिली. विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून युतीला भरघोस यश मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

