(देवरुख / सुरेश सप्रे)
बँक ऑफ इंडियाच्या १४ जिल्ह्यांचा सहभाग असलेल्या आंतर विभागीय बॅडमिंटन स्पर्धांचे आयोजन ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत देवरुख येथे करण्यात आले आहे. या स्पर्धेमुळे देवरुखसारख्या छोट्या शहराला राज्यस्तरीय क्रीडा वातावरणाचा अनुभव मिळणार आहे.
या स्पर्धेत महाराष्ट्रातील १४ जिल्ह्यांमधील बँक ऑफ इंडियाचे खेळाडू सहभागी होणार असून त्यातून निवड झालेल्या ६ संघांमधील एकूण ५४ पुरुष व महिला खेळाडू आपली खेळकौशल्ये सादर करणार आहेत. स्पर्धेत पुरुष व महिला ओपन सिंगल्स, ओपन डबल्स तसेच पुरुष व महिला सांघिक संघ स्पर्धा खेळवण्यात येणार आहेत. तीन दिवस चालणाऱ्या या स्पर्धांमुळे देवरुखवासीयांना दर्जेदार बॅडमिंटन सामने पाहण्याची संधी मिळणार आहे.
स्पर्धेपूर्वी गुरुवार, ५ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ७ वाजता खेळाडूंसाठी मार्गदर्शन व सूचना बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बँक ऑफ इंडिया रत्नागिरी झोनचे झोनल मॅनेजर नरेंद्र देवरे आणि डेप्युटी झोनल मॅनेजर अंजनी आझाद खेळाडूंना मार्गदर्शन करणार आहेत. खेळाच्या माध्यमातून बँकेची प्रतिमा उंचावावी आणि उत्तम कामगिरी करत देवरुखकरांची मने जिंकावीत, असे आवाहन नरेंद्र देवरे यांनी केले आहे. या स्पर्धेसाठी चीफ रेफ्री म्हणून नंदकुमार प्रभुदेसाई (सावंतवाडी) तर सहाय्यक रेफ्री म्हणून दिलीप विंचू काम पाहणार आहेत.
ही बॅडमिंटन स्पर्धा सुलभाताई आपटे क्रीडा अकॅडमी, देवरुख येथे बॅडमिंटन असोसिएशन ऑफ संगमेश्वर तालुका या मान्यताप्राप्त संघटनेच्या देखरेखीखाली पार पडणार आहे. संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन बँक ऑफ इंडिया आंचलिक क्रीडा समिती, रत्नागिरी करत असून समितीचे अध्यक्ष नरेंद्र देवरे (झोनल मॅनेजर), खजिनदार विनोद कदम (देवरुख) आणि सचिव किरण खोपडे (रत्नागिरी) यांनी यासाठी पुढाकार घेतला आहे.

