( संगमेश्वर / एजाज पटेल )
संगमेश्वर येथे राज्य परिवहन महामंडळाच्या बस स्थानकात बस थांबवण्याऐवजी काही एसटी बस चालक महामार्गावरच प्रवाशांना चढवण्या-उतरण्याची सवय लावत आहेत. या बेशिस्त कारभारामुळे प्रवाशांची धावपळ होत असून अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि वाहतूक शिस्तीसाठी जिल्हा परिवहन वरिष्ठांनी याची तातडीने दखल घेण्याची मागणी होत आहे.
संगमेश्वर हे मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक महत्त्वाचे मध्यवर्ती बस स्थानक आहे. या मार्गावरील बहुतांश एसटी बस येथे थांबूनच पुढील प्रवासाला निघतात. प्रवाशांच्या सोयीसाठी येथे अलीकडेच नवे आणि सुसज्ज बसस्थानक उभारण्यात आले आहे. विस्तृत प्रतीक्षा कक्ष, आसन व्यवस्था आणि फ्लॅट (प्लॅटफॉर्म) क्रमांकासह सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी योग्य बस सहज मिळेल, असा विश्वास निर्माण झाला होता.
मात्र काही चालकांची मनमानी या सर्व प्रयत्नांवर पाणी फिरवत आहे. हे चालक स्थानकाच्या आवारात बस न आणता राष्ट्रीय महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावरच बस थांबवतात. प्रवाशांना तेथेच उतरवून किंवा चढवून बस पुढे निघते. परिणामी बस स्थानकात उभे असलेले प्रवाशी बस चुकवतात, तर रस्त्यावर वाहतूक कोंडी व अपघाताचा धोका वाढतो.
या प्रकाराबाबत काही प्रवाशांनी वाहतूक नियंत्रण कक्षात वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी या स्थितीत बदल झालेला नाही. त्यामुळे प्रश्न उपस्थित होत आहे की, काही चालकांना बसस्थानकाचीच “एलर्जी” आहे काय?
प्रवाशांच्या सुरक्षिततेचा आणि सोयीचा विचार करता, या मनमानीवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे, अशी मागणी प्रवाशी जनतेतून होत आहे.

